ठसा – गोविंद पोवळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश पोवळे

1948 चा काळ असेल… अर्धी चड्डी आणि शर्ट अशा वेशातल्या 16 वर्षांच्या पोरसवदा मुलाने आकाशवाणी केंद्र गाठले. ‘मला ऑडिशन द्यायची आहे, माझा स्वर काळी तीन आहे,’ असे तो म्हणाला. योगायोगाने त्याच दिवशी आकाशवाणी ऑडिशन सुरू होत्या. पण शाळकरी वयातील त्या मुलाला पाहून आकाशवाणी केंद्रावरील अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले. मला गायचे आहे असे त्याने वारंवार सांगितल्यावर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी दिनकर अमेंबल यांनी त्याला गाण्याची संधी दिली. रेकॉर्डिंग स्टुडिओचा लाल लाईट लागला. त्या मुलाने ग.दि.मांचे एक गाणे म्हटले, ‘कशानं बाई गं काजळाला हात…’ इतक्यात लाल लाईट बंद झाला… त्या मुलाला वाटले आपण नापास झालो. पण अमेंबल धावत आले आणि म्हणाले, आम्हाला खूप चांगला गायक मिळाला! 1948 च्या काळातील हा पोरसवदा मुलगा म्हणजे ज्येष्ठ गायक, संगीतकार गोविंद पोवळे. त्यानंतर सलग 70 वर्षे आकाशवाणीवर गाण्याचा त्यांनी विक्रम केला. पोवळे यांच्या निधनाने भावसंगीताचा स्वरदूत हरपला आहे.

पनवेलजवळील चिरनेर हे गोविंद पोवळे यांचे गाव. 9 भाऊ आणि 2 बहिणी असा त्यांचा कुटुंबकबिला होता. वडील त्रिंबकराव हे कीर्तनकार. आई पार्वतीबाई यांना गाण्याची आवड. थोरले बंधू गोपीनाथराव हेही गायक. त्यामुळे गाण्याचे बाळकडू त्यांना कुटुंबातूनच मिळाले. गोपीनाथ पोवळे यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात मध्यंतरात गोविंद पोवळे यांना एखादे गाणे गायची हमखास संधी मिळे. इथूनच त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आईकडून दोन रुपये मागून ‘मला मुंबईला जायचे आहे’ असे सांगितले. त्या वेळी पनवेल ते मुंबई गाडीचे तिकीट सहा आणे होते. मुंबईत आल्यावर त्यांनी धोबीतलाव येथील त्याकाळचे रेडिओ स्टेशन गाठले आणि महाराष्ट्राला भावसंगीताचा सच्चा सूर गवसला. 30 मार्च 1948 रोजी गोविंद पोवळे यांचा रेडिओवर पहिला कार्यक्रम झाला. आकाशवाणीवर सुगम संगीत गाणारे ते सर्वात लहान वयाचे गायक ठरले. 1957 साली त्यांनी गिरगावात सुगम गायनाचे क्लासेस सुरू केले. त्यानंतर पार्ले, दादर, अंधेरी येथेही त्यांनी सुरू केलेल्या सुगम संगीताच्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असे.

एकदा गोविंदरावांना भेटण्यासाठी डोंबिवलीहून गीतकार मधुकर जोशी आले. त्यांनी आपली पाच-सहा गीते त्यांना दिली. त्यातील दोन गीते गोविंद पोवळे यांनी निवडली व स्वरबद्ध केली. कोलंबिया रेकॉर्ड कंपनीने त्यांच्या स्वतःच्या आवाजात ही गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यातील ‘माती सांगे कुंभाराला’ हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले. काही वर्षांनंतर ‘मिलेनियम साँग्ज’मध्ये ते समाविष्ट केले गेले.

शास्त्रीय रागदारीच्या परीक्षेची पद्धत पंडित दिगंबर विष्णू पलुस्करांनी सुरू केली. भावगीतासाठी मात्र तसा कोणताही अभ्यासक्रम आणि परीक्षा नव्हती. मग पुढे भावगीतांची अभ्यासपूर्ण बैठक नष्ट होईल की काय, या विचाराने गोविंदरावांनी महाराष्ट्र सुगम संगीत समिती स्थापन केली. त्यात प्रवेशिका, प्रथमा, सुबोध, सुगमा, प्रवीण, अलंकार अशा परीक्षांचा महाराष्ट्रातील पहिला अभ्यासक्रम तयार केला. परीक्षाही घेण्यास सुरुवात केली. त्याला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. पंडित पलुस्करांनंतर संगीताचा अभ्यासक्रम बनवण्याचे श्रेय निर्विवादपणे गोविंदराव पोवळे यांचेच. 48 परीक्षा केंद्रांतून पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिल्या. यात 8 वर्षांपासून ते 80 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी होते. दरवर्षी हजारो विद्यार्थी आजही परीक्षा देत आहेत. वयाच्या अखेरपर्यंत म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत गोविंद पोवळे हा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवत असत. अभिनेत्री सीमा देव आणि आशालता वाबगावकर यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतले होते.

50-60 च्या दशकात रेडिओवर लागणारे भावसंगीत ऐकण्यासाठी अख्खे कुटुंब एकत्र बसत असे. गजानन वाटवे, सुधीर फडके, आर.एन. पराडकर, विठ्ठल शिंदे, दशरथ पुजारी, दत्ता वाळवेकर आणि गोविंद पोवळे यांच्या भावगीतांना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. या गायकांच्या मैफलींना शेकडो रसिक गर्दी करत. गोविंद पोवळे यांच्या गाण्यांच्या अनेक तबकडय़ा एचएमव्ही पंपनीने बनवल्या. गोविंदरावांनी माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, पुष्पा पागधरे, जानकी अय्यर, नलिनी मुळगावकर, प्रमोदिनी देसाई यांच्याकडून गाऊन घेतलेली गाणीही तुफान लोकप्रिय झाली. ‘जीवलगा थांब, मोगरा फुले तोवर थांब..’, ‘शुभं करोती कल्याणम्..’, ‘राम सर्वांगी सावळा.. उमटली रामाची पावले..’ ‘पैंजण हरीचे वाजती..’ ‘कामधाम संसार विसरूनी हरीभजनी रंगली राधिका..’ ‘माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी..’ ‘रात्र काळी घागर काळी..’ ‘गंगा आली रे अंगणी..’  ही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकमान्य ठरली.

गोविंद पोवळे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गजानन वाटवे यांनीही गायली. पोवळे हे भावगीताच्या सुवर्ण युगाचे अखेरचे साक्षीदार होते. भावसंगीताचा इतका प्रचंड ठेवा निर्माण करणाऱ्या या मराठमोळ्या स्वरदूताला राज्य सरकार मात्र विसरले. मी कोणताही पुरस्कार मागण्यासाठी सरकारकडे जाणार नाही. सरकारला जर माझ्या कामाबद्दल काही वाटले तर त्यांनी जरूर विचार करावा, असे गोविंदराव ठामपणे सांगत. सरकारी पुरस्कारासाठी वर्णी लागावी म्हणून हल्लीचे गायक जोरदार लॉबिंग करतात. त्यांना ते पुरस्कार मिळतातही. पण सरकारने  कोणतीही दखल न घेतल्याची ना त्यांनी खंत व्यक्त केली ना खेद बाळगला. स्वाभिमानी, कृतार्थ आणि समाधानी जीवन जगलेल्या गोविंद पोवळे यांचा मराठी भावसंगीतातील सच्चा सूर अजरामर राहील.