हेअरकटचे बिल चुकवायला काढले कर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

इंटरनेटच्या  जगात अनेक प्रकारच्या घटना समोर येत असतात. काही तुम्हाला भावनाशील करतात, काही रोमांचित करतात, काही घाबरवतात, तर काही घटना, अनुभव वाचल्यावर हसावे का रडावे असे वाटायला लागते. चीनमधल्या ली नावाच्या तरुणाने त्याला आलेला असाच एक अनुभव शेअर केला आहे.

आकर्षक दिसण्याची हौस कोणाला नसते? त्यात चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध हेअरकटला प्रथम प्राधान्य दिले जाते. एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या ली याला त्याच्या मित्राने एका नावाजलेल्या सलोनचे गिफ्ट कुपन भेट दिले. 20 युआन अर्थात हिंदुस्थानी 230 रुपयांचा हेअरकट त्याला इथे फुकट करून मिळणार होता. ली महाराज आनंदाने त्या बिजिक्सिंग नावाच्या सलोनमध्ये दाखल झाले. सर्वात आधी तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला हेड मसाज देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्याला फेस पॅक लावण्यात आला. हे सर्व झाल्यावर अधिक सवलतींसाठी म्हणून त्याला एक गिफ्ट कार्डदेखील खरेदी करायला लावले.

ली याच्या सांगण्यानुसार हे सर्व करताना त्याचा चष्मा तिथल्या कर्मचाऱ्यांनी काढून ठेवला होता आणि त्यामुळे त्याला दरपत्रक बघता आले नाही. सर्व काही पार पडल्यानंतर ली याच्यासमोर 1 लाख पंधरा हजारांचे बिल ठेवण्यात आले. त्यामध्ये गिफ्ट कार्डचीच किंमत 58 हजार होती आणि इतर सेवांचे चार्जेस वेगळे. ली याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याला तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेरले आणि धमकावले, त्याचा फोन काढून घेतला आणि त्याच्या फोनमधील लोन अॅपवरून त्याला 58 हजारांचे कर्ज घेण्यास बळजबरीने भाग पाडले व बिल भरायला लावले. त्यावेळी आपण प्रचंड घाबरलो होतो असे ली म्हणतो. आता त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली आहे. ही घटना उघड झाल्यानंतर सलोन तातडीने बंद झाले आहे आणि सध्या तिथले स्थानिक अधिकारी या संपूर्ण प्रसंगाचा तपास करत आहेत.