वारीतील वारकरी तारुण्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रसेन टिळेकर / सत्याचा शोध

वारीच्या निमित्ताने भाविक, धार्मिक असलेल्या बळीराजाला आणि इतर कष्टकरी ग्रामीणवासीयांना भक्तिरसाची पर्वणी लाभते यात काही शंका नाही परंतु तरुण वयातील मुलंमुली करीअर आणि ऐन उमेदीच्या काळात चरितार्थासाठी वेळ खर्च करण्याचे सोडून 20-22 दिवस वारीसाठी देतात, वारीला जातात तेव्हा ते मनाला पटत नाही.

निवृत्तीनंतर काही दिवस देहू गावात असलेल्या शेतीत रमलो होतो. रस्त्याजवळील एका वावरात गुरे येऊन पिकांचे खूप नुकसान करायची म्हणून चार गडय़ांकडून कुंपणाचे काम करून घेत होतो. खरं तर हे काम लवकर उरकून मला मुंबईला यायचं होतं, पण झालं उलटंच. संध्याकाळी जरा निवांतपणे शेतघरात बसलो असता ते चारजण माझ्यासमोर आले. मी तत्परतेने त्यांचे मजुरीचे पैसे त्यांना देऊन टाकले. पण गंमत म्हणजे एरव्ही पैसे हातात पडताच पसार होणारे चौघे तिथेच घुटमळत राहिले. मग मीच त्यांना विचारलं, ‘काही काम आहे का?’

एकमेकांकडे पाहत त्यांच्यातला एकजण म्हणाला, ‘साहेब, एवढय़ा या दोन दिवसांत होईल तेवढं कुंपणाचं काम आम्ही उरकून घेतो. राहिलेलं काम वीस-बावीस दिवसांनी करू. आता काय थोडंच काम बाकी राहिलंय.’ ‘अरे पण असं काम अर्धवट ठेवून तुम्ही…’ मला पुढे बोलू न देता त्यांच्यातला एकजण म्हणाला, ‘पण साहेब, रस्त्याकडच्या वावराची बाजू आहे ना त्या बाजूला कंपाऊंड घालून झालं आहे. जनावरं तिकडच्या बाजूने जास्त येतात ना?’

‘ते सगळं खरं आहे रे, पण तुम्ही काम का बंद करताय?’

एकजण पुढे सरसावून म्हणाला, ‘काय साहेब, अहो दोन दिवसांनी आषाढी एकादशी आहे ना? त्या दिवशी आपल्या देहूगावातून तुकोबांची पालखी निघते ना पंढरपूरला जायला?’ कामाच्या गडबडीत मी पालखीचं विसरून गेलो होतो. पण ही मजूर मंडळी मला खास आठवण का करून देत होती ते काही समजेना. मग त्यातला एकजण म्हणाला, ‘साहेब, दरवर्षी आम्ही नेमाने वारीत जातो. एक वर्षीही खाडा करत नाही आणि एकदा वारीत गेल्यावर 20-22 दिवस आम्ही तिकडेच असतो. म्हणून आम्ही आता 20-22 दिवस काम बंद ठेवणार आहोत.’

हे ऐकून मला काहीसा धक्काच बसला. कारण हे मजूर ऐन तिशीतलेच होते आणि त्यांचे हातावर पोट होते. अशा स्थितीत 20-22 दिवस त्यांनी कामधंदा सोडून वारीत जावे हे काही पटेना. त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या कारभारीण घर सांभाळतील म्हणावे तर त्याही कुणाच्या ना कुणाच्या शेतात खुरपणीला जाऊन प्रपंचाला हातभार लावणाऱया. प्रपंच सोडून, रोजगार बुडवून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल वीस-बावीस दिवस घराबाहेर असणाऱया या लोकांच्या जेवणाचे, गाडीभाडय़ाच्या खर्चाचे काय, असा मला प्रश्न पडला.

‘अरे, पण तुमच्या जाण्यायेण्याचा, राहण्याचा, जेवणाच्या खर्चाचं काय?’ ते मला म्हणाले, ‘अहो तसा काही खास खर्च येत नाही. ज्या गावात मुक्काम असतो तिथले गावकरी चांगलं गोडाधोडाचं जेवण करतात. रात्री मुक्काम एखाद्या पीक नसलेल्या शेतात, माळरानावर करायचा.’

‘ठीक आहे, पण एवढे दिवस पायी चालत जायचं म्हणजे पाय दुखत नाही का तुमचे?’

‘अहो साहेब, आम्ही जमेल तेवढंच चालतो. कंटाळा आला की कुठल्याही एसटीला हात करतो. आमच्या हातात भगवा झेंडा असतोच. त्यामुळे कंडक्टर तिकीटही विचारत नाही.’

हे सगळं ऐकल्यावर मी काय बोलणार? मुकाटय़ाने काम बंद करून मी मुंबईला आलो. पण माझ्या डोक्यात सारखे विचारपा चालू होते की ऐन उमेदीच्या काळात चरितार्थासाठी वेळ खर्च करण्याचे सोडून ही तरुण मंडळी वारीत केव्हापासून जायला लागली? कारण पूर्वी आपला प्रपंच संपला की वृद्ध मंडळी तो घरातल्या तरुण मंडळींच्या हवाली करून दरवर्षी वारीत जाण्यासाठी आषाढी कार्तिकेची वाट पाहायची. इतकी वर्षे काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकल्यानंतर त्या जेष्ठांना विरंगुळा मिळणे हा त्यांचा हक्कच होता. वारीच्या निमित्ताने हा विरंगुळा तर त्यांना मिळतोच, पण जात्याच भाविक, धार्मिक असलेल्या आमच्या बळीराजाला आणि इतरही कष्टकरी ग्रामीणवासीयांना वारीच्या निमित्ताने भक्तिरसाची पर्वणीच लाभते यात काही शंका नाही. यामुळेच कळायला लागल्यापासून जरी मी नास्तिकतेकडे झुकलेला असलो तरी वारी या प्रकाराबद्दल माझ्या मनात प्रीतीचीच भावना आहे. पण वारीबद्दल आस्था असण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे माझे कुटुंब वारकरी आचार-विचारांचेच. पालखीच्या दिवशी त्या पालखीला खांदा द्यायला वडील न चुकता देहूला जात. तेव्हा मीही ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीप्रमाणे तुकोबांच्याच गावचा. जात असे. आधी म्हटल्याप्रमाणे पुरोगामी विचारांची लागण ऐन तारुण्यातच झाल्याने संतांच्या मांदियाळीत इतर संतांपेक्षा तुकोबा वैचारिक सगेसोयरे झाले नसते तरच नवल. परंतु हे असं काहीही असलं तरी तरुणांनी वारीत जाणे हे मनाला खटकलेच.

मुंबईला आल्यावर त्यावेळी हयात असलेल्या प्रसिद्ध कवयित्री अन् ‘ब्र’ या कादंबरीच्या लेखिका व दरवर्षी वारीत औषधे घेऊन जाणाऱया कविता महाजन यांच्याशी संपर्क साधला. वारीतील तरुणांचा सहभाग हा विषय काढताच त्या म्हणाल्या, ‘अहो, हे तर गैरच आहे. पण अलीकडे दहा-बारा वर्षांच्या मुलांना धोतर बंडी घालून हाती टाळ-चिपळ्या देऊन काही भाविक पालक आपल्या मुलांना वारीत पाठवू लागले आहेत.’

मला वाटते, कुणाही सुजाण माणसाला ही बाब पटण्यासारखी नाही. कोवळ्या वयात भक्तीची अशी लागण ही निश्चितच अनिष्ट आहे. कारण हे वय भक्तीचे अन श्रद्धा जोपासण्याचे नाही. तर नाना तऱहेच्या शंका-कुशंका विचारून आपले कुतूहल शमविण्याचे, आधुनिक ज्ञान मिळवण्याचे आहे. शाळकरी मुलांची दिंडी जवळ आल्यावर दहा वर्षांच्या पोराच्या पायावर साठ वर्षांचे गावकरी दंडवत घालतात. यातून कोवळ्या मनाला काय संदेश जात असेल याचा आपण सर्व जाणत्या मंडळींनी विचार केला पाहिजे आणि स्वतला प्रश्न विचारला पाहिजे की, आपल्याला भावी पिढीतून काय निर्माण करायचे आहे.

> [email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)