
>>प्रसाद ताम्हणकर
आधुनिक तंत्रज्ञान आणि विशेषत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) ही एक दुधारी तलवार आहे असे मानले जाते. हे तंत्रज्ञान जर गुन्हेगारांच्या हातात असेल तर ते किती सहजतेने गुन्हे करू शकतात, लोकांची आर्थिक फसवणूक करू शकतात हे आता हळूहळू समोर यायला लागले आहे. मात्र हेच तंत्रज्ञान जर कायद्याच्या हातात असेल तर अशा गुन्हेगारांवर कशी मात करता येते ते सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखवून दिले आहे आणि त्यांच्या या विशेष कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या ग्राम विकास अधिकारी पदाच्या भरती परीक्षेदरम्यान पोलिसांच्या विशेष कार्यदलाने सुमारे 200 तोतया परीक्षार्थींना अटक केली होती. एकाच वेळी इतके तोतया (डमी) परीक्षार्थी पकडले जाण्याची ही पहिली वेळ आहे.
या तोतयांना पकडण्यासाठी विशेष दलाने जे आधुनिक तंत्रज्ञान सफाईने वापरले त्याचेदेखील कौतुक करण्यात येत आहे. एक प्रकारे तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱयांना पोलिसांनी दुसऱया आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन वेळीच अटक केली आहे. या तोतयांना अटक करण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशल इंटेलिजन्सची (Aघ्) मदत घेतली आहे. पूर्वी आपल्या जागी एखाद्या दुसऱया व्यक्तीला परीक्षार्थी म्हणून बसवण्यासाठी वेगवेगळय़ा युक्त्या लढवल्या जात असत. परीक्षेसाठीच्या ओळखपत्रावर तोतयाचा फोटो आपला म्हणून लावणे आणि आपल्या जागी त्याला परीक्षार्थी म्हणून बसवणे हा त्यातला प्रमुख प्रकार होता. मात्र तो बराच धोकादायकदेखील होता. त्यात अनेकदा पकडले जाण्याची शक्यता असायची.
मात्र आधुनिक तंत्रज्ञान अवतरले आणि गुन्हेगारांनी त्याचा फायदा उठवला. फोटो एडिटिंगच्या एका सॉफ्टवेअरच्या प्रगत आवृत्तीचा त्यासाठी वापर करण्यात आला. खरा परीक्षार्थी आणि त्याच्या जागी बसणारा तोतया या दोघांच्या चेहऱयाचे फोटो एकत्र करून एक नवा फोटो बनवण्यात येत होता. हा फोटो ओळखपत्रावर लावला जात असे. या नव्या फोटोत परीक्षार्थी आणि तोतया दोघांच्या चेहऱयातले साम्य असे. फोटोतल्या या साम्यामुळे तोतया परीक्षार्थी ओळखणे परीक्षकांना अवघड होत असे आणि असे तोतये आरामात परीक्षेला बसून पेपर सोडवत असत. या प्रकाराला फेस मास्किंग असे म्हटले जाते.
हा खेळ लक्षात आल्यावर पोलिसांनीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे जर एखाद्याच्या चेहऱयाच्या फोटोसोबत फेस मिक्सिंगचा वापर केला गेला असेल आणि त्या विशिष्ट व्यक्तीचा फोटो आधीच पोलिसांच्या डेटाबेसमध्ये असेल तर फेस मास्किंगचा फोटो डोळय़ांतील रेटिना आणि चेहरा ओळखण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतींद्वारे शोधला जाऊ शकतो. पोलिसांनी यासाठी परीक्षा आयोजित करणाऱया एजन्सीची मदत घेतली. सदर एजन्सी परीक्षार्थींना त्यांच्या आधारकार्डची माहिती आगाऊ विचारते. त्यामुळे त्याच्याकडे परीक्षेच्या आधीच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या छायाचित्रांचा डेटाबेस तयार होता. पोलिसांनी परीक्षा ओळखपत्रावरचा फोटो आणि एजन्सीकडे असलेला फोटो यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणी केली आणि एकूण किती तोतये बसले आहेत त्याचा अचूक अंदाज पोलिसांना आला. ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांचे पितळ उघडे पडले. परीक्षा सुरू असताना अर्थात ‘रिअल टाइम’मध्ये पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली.
आता हाच प्रयोग इतर परीक्षांच्या बाबतदेखील राबवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. आजकाल बऱयाच परीक्षा या
ऑनलाइन होतात. अशा वेळी परीक्षार्थीचा पीन बघणे? त्याने तो पीन कोणाशी शेअर केला आहे का? कोणी दुसरा रिमोटली परीक्षार्थीचा संगणक हाताळत आहे का? हे तपासणे परीक्षकांसाठी अनेकदा अशक्य असते. अशा वेळी परीक्षार्थीकडून फसवणूक केली जाण्याची मोठी शक्यता असते. मात्र आता आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित अशी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, ज्यांच्या मदतीने परीक्षार्थीच्या चेहऱयावरील हावभावाचा अभ्यास करून अशी फसवणूक आणि तोतये सहज पकडता येतील. या यशानंतर यूपी पोलिसांनी आता परीक्षेपूर्वी, परीक्षेदरम्यान आणि नंतर फसवणूक करणाऱ्या लोकांच्या पद्धती, युक्त्या यांचा अभ्यास आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू केला असून लवकरच या त्रिस्तरीय उपाययोजनेचे यश दिसायला लागेल, अशी त्यांना खात्री आहे.
– [email protected]




























































