लेख – हिंदुस्थानी असंतोषाचे जनक

  • रणवीर राजपूत

लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्यता दिलेलं एक परखड अन् जहालमतवादी व्यक्तिमत्त्व. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’, असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे हे लोकमान्य टिळकच. लोकशिक्षण व जनजागृती करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिकरीत्या साजरे करण्याची प्रथा सुरू केली. व्यापक जनआंदोलन हाच स्वातंत्र्यप्राप्तीचा खरा मार्ग आहे हे लोकांच्या मनात बिंबवून टिळकांनी जनमानसाला सहअस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यांच्या जयंती दिनानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतल्या त्यांच्या भरीव योगदानावर प्रकाश टाकणारा हा लेख.

स्वातंत्र्य लढय़ाच्या धुमश्चक्रीत लोकांच्या हृदयात स्वराज्याची मशाल पेटवून इंग्रजांच्या जुलमी राजवटीला सुरुंग लावणारे जहाल नेतृत्व म्हणून लोकमान्य टिळकांची जनमानसात ओळख होती. फिरंग्यांच्या गुलामगिरीतून हिंदुस्थानींची मुक्तता व्हावी, या उद्देशाने त्यांनी समाजसुधारक आगरकर यांच्या मदतीने ‘केसरी’ अन् ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करून त्याद्वारे जनमत उभे केले. हिंदुस्थानींच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवून इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण केला. त्यामुळेच टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले जाते.

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून टिळकांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी हिंदुस्थानीयांना आपल्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्या मनात ब्रिटिश सत्तेच्या जुलमी राजवटीविरुद्ध चीड निर्माण केली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांमध्ये एकात्मता, बंधुभाव व देशप्रेमाची जाज्ज्वल्य भावना निर्माण करण्यासाठी ‘राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण.. हे राष्ट्रीयत्व कायम राखण्याचे एक उत्तम साधन आहे’ या विचाराच्या आधारावर टिळकांनी ‘शिवजयंती व गणेशोत्सव’ हे उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करण्याची प्रथा सुरू केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी 1895मध्ये जनआंदोलन करून ते यशस्वी केले. अन् लगेचच 15 एप्रिल 1896 रोजी रायगडावर मोठय़ा थाटामाटात ‘शिवजयंती’ साजरी केली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या शौर्याची व योगदानाची रयतेला माहिती व्हावी, या उद्देशाने शिवजयंती हा उत्सव केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यात साजरा करण्यास चालना दिली. राष्ट्रपुरुषांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवण हृदयात ठेवून त्यांचा अभिमान बाळगणे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे, हा संदेश टिळकांनी एका अर्थाने नागरिकांना दिला आहे.

स्वातंत्र्य लढय़ादरम्यान टिळकांनी ‘स्वराज्य, स्वदेशी अन् विदेशीचा बहिष्कार’ या त्रिसूत्राचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवून त्यातून जन आंदोलनाची उभारणी केली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या वृत्तपत्रांसाठी स्वदेशी कागदाचा वापर करण्यावर भर दिला. ब्रिटिश राजवटीविरोधी उभारलेल्या या चळवळीला यशस्वी करण्यासाठी टिळकांसह महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्र्ााr चिपळूणकर, गोपाळकृष्ण गोखले, न्या. महादेव रानडे, चापेकर बंधू, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, रवींद्रनाथ टागोर अशा अनेक क्रांतिवीरांनी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, 1908मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेच्या भावना भडकविण्याच्या राजद्रोहाखाली इंग्रज सरकारने टिळकांना मंडाले तुरुंगात सहा वर्षांची काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली. परंतु कैद्यासारखे न जगता त्यांनी तेथे ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. त्यामुळेच त्यांना ‘लोकमान्य’ ही उपाधी जनमानसाने बहाल केली आहे.

सन 1887मध्ये पुणे शहरात प्लेगच्या साथीने हाहाकार माजवला असताना टिळकांनी लोकांना मोठा धीर दिला. या महामारीकडे इंग्रज प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. या अमानवीय अन् भ्याड कृत्याचा टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’तून तीव्र शब्दांत धिक्कार करून निषेध नोंदविला. इंग्रज प्रशासनाच्या मदतीला भीक न घालता टिळकांनी स्वतःच्या हिमतीवर प्लेगग्रस्तांना मदतीचा हात देऊन एक सच्चा देशभक्त म्हणून आपली भूमिका समर्थपणे बजावली. रुग्णांना सर्वप्रकारची वैद्यकीय सेवा सुविधा पुरवून हजारो हिंदुस्थानींचे प्राण वाचविले. खरं तर टिळकांच्या या देशप्रेमी रुग्णसेवेला तोड नाही, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.

शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही कारण त्याशिवाय मानवाची बौद्धिक, सामाजिक, आर्थिक अन् वैचारिक उन्नती होऊ शकत नाही, ही गोष्ट त्यांनी लोकांच्या मनावर बिंववली. न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड हे शिक्षण घेतल्यावरच कळते, असा मोलाचा उपदेश टिळकांनी जनतेला दिला. टिळक हे स्वतः पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी 1882 साली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. हिंदुस्थानींची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तसेच पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची उभारणी केली. हिंदुस्थानी समाजाचा शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक पाया मजबूत होण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे हे जाणून टिळकांनी आपल्या वृत्तपत्रांद्वारे लोकशिक्षणाचाही प्रभावीरीत्या प्रचार व प्रसार केला. शिक्षण हा उन्नत समाजाचा पाठीचा कणा आहे, हे त्यांनी पारतंत्र्याच्या काळात लोकांच्या मनावर बिंबविले.

‘बंगालची फाळणी’ हा प्रश्न केवळ स्थानिक प्रश्न नसून हिंदुस्थानी अस्मितेवर घातलेला वज्राघात आहे, याची जाणीव लोकांना टिळकांनी करून दिली. लाल-बाल-पाल या देशभक्तांनी ब्रिटिश प्रशासनाच्या दुष्ट मनसुब्यांचा पर्दाफाश करून या जुलमी सत्तेविरुद्ध लोकांच्या मनात असंतोष निर्माण केला. आपल्या मातृभूमीची ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी टिळकांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. टिळकांचे स्मरण झाले म्हणजे हिंदुस्थानी स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील एक पर्व, एक युग, एक अध्याय डोळ्यांसमोर येतो. जाज्ज्वल्य देशाभिमान व दुर्दम्य राष्ट्रप्रेम प्रत्येक देशबांधवाने मनाशी बाळगावे, हीच खरी लोकमान्य टिळकांना आदरांजली ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या