एकेकाला का अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो! अरविंद केजरीवाल यांचे मोदींना आव्हान

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांना अटक करण्यात आली. त्यावरून संतप्त झालेल्या केजरीवाल यांनी आमचा गुन्हा काय आहे असा सवाल करत एकेकाला कशाला अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो, हिंमत असेल तर करा आम्हाला अटक! असे जोरदार आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या इशार्‍यानंतर दिल्ली पोलिसांनी लगोलग भाजप मुख्यालयाभोवती कडक चौक्या पहारे बसवले आहेत.

आम आदमी पार्टीच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मालीवाल यांच्या जबाबानंतर आज दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना ताब्यात घेतले. विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला असून त्यात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

भाजपचे लोक आम आदमी पार्टीच्या का मागे लागले आहेत? आम्ही असा कोणता गुन्हा केला आहे? अगोदर मनीष शिसोदियांना अटक केली. त्यानंतर सत्येंद्र सिन्हा, संजय सिंह यांनाही कारागृहात डांबण्यात आले. मलाही अटक करण्यात आली. आता राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, आतिशी यांनाही अटक करणार असल्याचे सांगत आहेत. तुम्ही जेल-जेलचा खेळ खेळताय. एकेकाला कशाला अटक करताय. त्यापेक्षा उद्या दुपारी १२ वाजता आम्ही सगळे भाजप मुख्यालयात येत आहोत. तुम्हाला ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे, त्यांना टाका. आम आदमी पार्टीच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्याने तर पक्ष संपेल अशा भ्रमात पंतप्रधान मोदी आहेत. आम आदमी पार्टी हा एक विचार आहे, जेवढ्या नेत्यांना तुरुंगात टाकाल, तितक्याच ताकदीने आमचे नेते देश घडवतील असे केजरीवाल म्हणाले.