भाजप प्रवेशासाठी माझ्यावर दबाव, पण मी झुकणार नाही! अरविंद केजरीवाल यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप प्रवेशासाठी माझ्यावर आणि ‘आप’च्या नेत्यांवर दबाव टाकला जात आहे, असा गौप्यस्पह्ट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला. भाजपात गेले की सगळे खून माफ होतात, हे लोक सांगतात, भाजपात या, सोडून देतो. पण आम्ही काहीही चुकीचे केलेले नसल्यामुळे झुकणार नाही. मी त्यांना सांगितले, मुळीच भाजपात येणार नाही, अशा शब्दांत मोदी सरकारवर त्यांनी सडकून टीकाही केली. दिल्लीत दोन शाळांच्या पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

मला तुरुंगात डांबले तरीही दिल्ली सरकार लोककल्याणाची कामे करतच राहणार, शाळा बांधण्याचे आणि मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून लोकांना मोफत उपचार मिळण्याचे काम अजिबात थांबणार नाही, असेही केजरीवाल म्हणाले. मनीष सिसोदिया यांनी शाळा बांधल्या. त्यामुळे त्यांना तुरुंगात डांबण्यात आले तर सत्येंद्र जैन यांनी मोहल्ला क्लिनिक सुरू केले. त्यांचा तो गुन्हा ठरवून त्यांना तुरुंगात टाकले. मोदी सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांना हाताशी धरून ‘आप’च्या नेत्यांवर दबाव आणत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.