
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार अरविंद सावंत यांनी नुकतीच पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांची भेट घेतली. प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूस मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रेल्वे लाईनवरून थेट पादचारी पूल बांधावा, अशी मागणी यावेळी त्यांच्या वतीने केली.
प्रभादेवी स्थानकावरील वाहतूक रस्ता विकासकामांसाठी बंद होणार आहे. त्यामुळे प्रभादेवी स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांना ये-जा करणे कठीण होणार आहे. यासाठी येथील नागरिकांच्या वतीने ही मागणी खूप वर्षांपासून केली जात आहे. त्यातच प्रभादेवी स्थानकावरील विद्यमान पुलावर अतिशय अरुंद पादचारी सडक आहे. परळ आणि प्रभादेवी स्थानकाच्या पूर्वेस केईएम, ग्लोबल ही रुग्णालये आहेत तर सोशल सर्व्हिस लीग, आर. एम. भट, डॉ. शिरोडकर या शाळा आणि एम. डी. कॉलेज आहे. या सर्वांना हा पादचारी पूल झाला तर कायमस्वरूपी सोय होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली. त्यानुसार शुक्रवारी ही संयुक्त पाहणी करण्यात आली. यावेळी पश्चिम रेल्वेचे भद्र तर मध्य रेल्वेचे गुप्ता आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी शाखाप्रमुख विजय भणगे, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण तोरसकर उपस्थित होते.

























































