एमटीएनएलचा पत्ता नाही अन् ‘संचार साथी’ आणत आहेत! अरविंद सावंत यांचा सरकारवर हल्ला

‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेडसारखी कंपनी पुरती डबघाईला आलेली आहे. हे सरकार ती कंपनी वाचवू शकले नाही आणि ‘संचार साथी’ अॅप आणत आहेत. हे अॅप अत्यंत घातक असून नागरिकांच्या गोपनीयतेवर आक्रमण आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्या,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज सरकारवर हल्ला चढवला.

अरविंद सावंत यांनी सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएलचा दाखला देऊन सरकारला झोडपून काढले. ‘एमटीएनएलच्या अवस्थेकडे 2014 साली आम्ही सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळी एमटीएनएलचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आता त्या कंपनीची सेवा कुठे मिळते हेही कोणाला माहीत नाही. ही कंपनी आहे की नाही हेही माहीत नाही. अलीकडेच व्हीएसएनएलच्या कर्मचाऱयांचा वेतन करार झाला, एमटीएनएलच्या कर्मचाऱयांचा करार झाला नाही. एकेकाळी या पंपनीत 60 हजार कर्मचारी होते, आता फक्त 3200 कर्मचारी राहिले आहेत. याबद्दल काही करण्याचे सोडून सरकार ‘संचार साथी’ आणत आहे, असा चिमटा सावंत यांनी काढला.

एमटीएनएलच्या कर्मचाऱयांना बीएसएनएलमध्ये सामावून घ्या!

एमटीएनएलमध्ये सध्या 3200 कर्मचारी आहेत. ते नेमके काय करतात माहीत नाही. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांत व्होडाफोन इंडिया सेवा देत आहे. एमटीएनएलच्या लोकांना न्याय मिळत नाही. या सगळ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या आणि त्यांना बीएसएनएलमध्ये सामावून घ्या, अशी आग्रही मागणी सावंत यांनी केली.

हे एक प्रकारचे पेगासस!

‘पूर्वी एखादा लँडलाइन नंबर निरीक्षणाखाली ठेवायचा असेल तरी पोलीस कंपनीला रीतसर पत्र देत असत. मनात आले म्हणून काही करता येत नसे. त्यामुळे संचार साथी हे अॅप इन-बिल्ट असेल तर ते घातक आहे. हे एक प्रकारचे ‘पेगासस’ आहे. नागरिकांच्या गोपनीयतेचा हा भंग आहे. आता सरकारने यावर मवाळ भूमिका घेतली असली तरी हे अॅप बंद करायला हवे, अशी मागणी सावंत यांनी केली.