आर्यनची आज सुटका होणार, जामीन आदेशाची प्रत वेळेत तुरुंग प्रशासनाकडे पोहचलीच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी जामीन मंजूर होऊनही आर्यन खान याला आजची रात्रही तुरुंगातच घालवावी लागली. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला, जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला हिने आर्यनच्या अर्जावर सहीदेखील केली. मात्र जामीन आदेशाची प्रमाणित प्रत वेळेत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडे न पोहोचल्याने आर्यन आज तुरुंगातून बाहेर पडू शकला नाही. आज शनिवारी आर्यन आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

आदेशाची प्रमाणित प्रत आर्थर रोड तुरुंगात सायंकाळी 5.30 पर्यंत पोहोचणे आवश्यक होते, पण हा दस्तावेज तुरुंगात वेळेत पोहोचला नाही. आर्यनबरोबर अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. निकालाची प्रत आज दुपारी 3.30 च्या सुमारास उपलब्ध झाली. या निकालाची प्रत आर्यनच्या वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केली.

हायकोर्टाने आर्यनला घातलेल्या अटी

प्रत्येक आरोपीला एक किंवा अधिक जामीनदारासह एक लाख रुपयांचा पी. आर. बॉण्ड देणे आवश्यक, आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत तशा कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये, आरोपींनी या गुह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करू नये, आरोपींनी एनडीपीएस विशेष न्यायालयासमोर सुनावणी सुरू असलेल्या कोणत्याही गोष्टीत बाधा येईल अशी कृती करू नये, आरोपीने साक्षीदारांना प्रभावित करू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये, पासपोर्ट विशेष न्यायालयाकडे जमा करावेत, आरोपींनी विशेष न्यायालयासमोर सुरू असलेल्या प्रकरणावर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांसमोर वक्तव्य करू नये, परवानगीशिवाय आरोपींनी देश सोडून जाऊ नये, मुंबईबाहेर कुठेही जायचे असेल तर त्यांना तपास अधिकाऱयांना याची माहिती देणे बंधनकारक, प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावावी तसेच न्यायालयातील प्रत्येक तारखेला हजर रहावे. आरोपींना एनसीबी तपासासाठी जेव्हा जेव्हा बोलावेल तेव्हा चौकशीसाठी हजर रहावे लागेल, खटला सुरू झाल्यानंतर आरोपीने ही सुनावणी प्रलंबित होईल किंवा उशीर लागेल असे काहीही करू नये. यापैकी कोणत्याही अटीचा भंग केल्यास एनसीबीला विशेष न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अधिकार असेल.