
सामना प्रतिनिधी । एजबॅस्टन
वन डे वर्ल्ड कप ही ‘आयसीसी’ची प्रतिष्ठsची स्पर्धा आटोपल्यानंतर आता इंग्लंडमध्ये आणखी एका मानाच्या स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला उद्यापासून बार्ंमगहॅम येथील एजबॅस्टन येथे सुरुवात होणार आहे. टेस्ट क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील द्वंद्वाने होणार आहे. याप्रसंगी दोन देशांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
पराभवाचा वचपा काढायचाय…
2015 साली वन डे वर्ल्ड कपचा विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. यजमान इंग्लंडने त्यांना हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मानही संपादन केला. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कांगारूंचा संघ सज्ज झाला असेलच. स्टीवन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर या बॉल टॅम्परींगमध्ये अडकलेल्या खेळाडूंसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. तसेच जेम्स पॅट्टीनसन, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क या तेज गोलंदाजांच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाची मदार असणार आहे.
18 वर्षांनंतर…
इंग्लंडचा संघ 2001 सालापासून मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून हरलेला नाही. त्यामुळे मागील मायदेशातील मालिका कांगारूंनी जिंकली असली तरी त्यांच्यासाठी इंग्लंडला त्यांच्याच देशात हरवणे सोपे नाही. 18 वर्षांनंतर टीम पेनचा ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला हरवतोय का हे पाहणे रंजक ठरेल.
इंग्लंडचा चमू : रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो रूट (कर्णधार), जो डेन्ली, जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टॉ (यष्टिरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स ऍण्डरसन.
2 वर्ष, 9 संघ अन् 71 कसोटी सामने
उद्यापासून वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात होत असून पुढील दोन वर्षे ही मालिका सुरू राहणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये नऊ संघ 71 कसोटी सामने खेळणार आहेत. 2021 सालामध्ये कसोटी क्रिकेटमधला पहिला चॅम्पियन मिळणार आहे.
पहिली कसोटी, ऍशेस
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड
बार्ंमगहॅम, दुपारी 3.30 वाजता





























































