
ऑस्ट्रेलियाने अॅशेस सीरिज 2021-22 वर कब्जा केला असला तरी या सीरिजचा रोमांच अद्यापही बाकी असल्याचे आज दिसले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सिडनीच्या मैदानावर झालेली चौथी टेस्ट क्रीडाप्रेमींसाठी पैसा वसूल ठरली. इंग्लंडच्या अखेरच्या जोडीने महत्प्रयासाने ही कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले. मात्र दोन्ही बाजूचा खेळ पाहून क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले.
सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 विकेट्सची आवश्यकता होती, इंग्लंडचा संघ प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरणार होता. ऑस्ट्रेलियासाठी पाचव्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. खराब फॉर्मात असणाऱ्या हसीब हमीद याला बोलंडने बाद केले, तर मलानला नाथन लायनने बोल्ड केले.
क्राऊली-स्टोक्सचे झुंजार अर्धशतक
सलामीवीर जॅक क्राऊली आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी अर्धशतकीय खेळी केली. क्राऊली ग्रीनच्या गोलंदाजीवर 77 धावा काढून बाद झाला, तर स्टोक्सला लायनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. स्टोक्स पाचव्या गड्याच्या रुपाने बाद झाला. त्याने 60 धावा केल्या.
बेअरस्टोसह लोअर ऑर्डरची झुंज
स्टोक्स बाद झाल्यानंतर मैदानात आलेला बटलर देखील 11 धावा काढून बाद झाला. पाठोपाठ मार्क वूडही शून्यावर माघारी परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा उंचावल्या. मात्र बेअरस्टो, लीच आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी अखेरची षटकं खेळून काढत अटीतटीचा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
A job well done from Stuart Broad and James Anderson ✅ #Ashes | #WTC23 pic.twitter.com/cERNvmGBbt
— ICC (@ICC) January 9, 2022
10 षटकांचा रोमांच
अखेरच्या 10 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 2 विकेट्स हव्या होत्या. तत्पूर्वी कमिन्सने नवा चेंडू घेतला आणि 105 चेंडू खेळून काढलेला बेअरस्टो बोलंडच्या गोलंदाजीवर बाद झाला. बेअरस्टो बाद झाला तेव्हा अखेरची 10 षटकं बाकी होती. दोन विकेट्स घेण्यासाठी कमिन्सने फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षक लावले, स्लिपमध्ये चार-चार खेळाडूंना ठेवले, मात्र ऑस्ट्रेलियाला फक्त एकच विकेट घेता आली. जेम्स अँडरसन अखेरचे षटक खेळत होता तेव्हा स्टोक्सने अघटीत पहायला मिळू नये म्हणून आपला चेहराही लपवून ठेवला होता. मात्र अँडरसन याने अखेरचा चेंडू खेळून काढला आणि इंग्लंडच्या गोटाने सुटकेचा निश्वास सोडला.




























































