
‘अॅशेस’ मालिकेच्या पहिल्या कसोटाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला. पर्थ स्टेडियमवरील उन्हाळी वातावरणात दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी एवढा कहर केला की, एकाच दिवशी दोन्ही संघांच्या 19 विकेट्स कोसळल्या आणि कसोटीचा अर्धा भाग पहिल्या दिवसाअखेरीसच संपला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 172 धावांत गुंडाळले तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची 9 बाद 123 अशी दयनीय अवस्था करत पहिल्या डावातील आघाडीच्या दिशेने झेप घेतली.
टॉस जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा डाव 172 धावांवर उत्कंठावर्धकरीत्या संपला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने 58 धावांत 7 विकेट घेत इंग्लंडची कोंडी केली. पहिल्याच षटकात झॅक क्राऊलीला बाद करत त्याने थैमान माजवले आणि दुपारपर्यंत इंग्लंडचा डाव गुंडाळला.
मात्र सामन्याचे चित्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुन्हा बदलून दाखवले. जोफ्रा आर्चरने ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि इंग्लंडच्या वेगवान तुफानाने यजमान संघाला जबर हादरे दिले. मधल्या सत्रात स्वतः कर्णधार स्टोक्सने हातात चेंडू घेतला आणि त्याने आपल्या 6 षटकांच्या गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट काढून दिवसाचा शेवट भन्नाट केला. त्याने 4 बाद 73 वरून दिवसअखेर 9 बाद 123 अशी नाटय़मय स्थिती केली. उद्या इंग्लंडचा संघ किमान 40 धावांची आघाडी घेईल, असा अंदाज आहे. आज दिवसभरात 19 विकेट्स पडल्या तर हॅरी ब्रुकने 52 धावांची खेळी केली. तसेच हॅरी ब्रुक आणि ओली पोपने चौथ्या विकेटसाठी 55 धावांची सर्वोच्च भागी केली. त्याचबरोबर तब्बल एका शतकानंतर ‘ऍशेस’ मालिकेत एका दिवसांत 19 विकेट पडण्याची दुर्मिळ घटनाही घडली.

























































