शिर्डी संस्थानला भाविकांनी दिलेल्या देणगीवर राज्य सरकारचा घाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अशोक चव्हाण - 1) 8 डिसेंबर, 2008 ते 15 ऑक्टोबर, 2009, 2) 7 नोव्हेंबर, 2009 ते 9 नोव्हेंबर, 2010 (काँग्रेस)

सामना प्रतिनिधी । नांदेड

राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला विचारण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानने दिलेल्या 500 कोटी रूपये कर्जाबाबत बोलतांना खा. चव्हाण म्हणाले की, राज्यातील प्रकल्प हे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. पण सरकारला आर्थिक नियोजन नसल्याने केवळ ४ वर्षात या सरकारने राज्यावर पाच लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. पुरवणी मागण्यांचा तर जागतिक विक्रम या सरकारने केला आहे. महालेखापालांनीही या सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकार पेट्रोल, डिझेलवर दुष्काळी कर लावला तसेच हायवेवरील दारूची दुकाने बंद केली म्हणून सेस लावून जनतेचे कंबरडे मोडत आहे. सत्तेवर आल्यावर मोठमोठ्या वल्गना करून श्वेतपत्रिका काढणाऱ्या सरकारचे पितळ आता उघडे पडले आहे.

सिंचनाकरिता मागील सरकारने दिलेल्या सुधारीत प्रशासकीय मान्यतांवर बोट ठेवणाऱ्या भाजपच्या सरकारने गेल्या तीन वर्षात ६४ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्तीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. जलयुक्त शिवारमधील घोटाळे देखील पुढे आले आहेत. याचबरोबर वित्त आयोगाने महाराष्ट्रात सिंचन क्षमतेत काडीमात्र वाढ झाली नाही. असे सांगत या सरकारला आरसा दाखवला आहे. त्यासोबतच भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रात जवळपास ३१ हजार गावांत भूजल पातळीत मोठी घट झाली आहे, हे स्पष्ट झाले आहे.

घोर भ्रष्टाचार केल्यानंतर आता सरकारचा भाविकांनी देणगी म्हणून दिलेल्या देवस्थानांच्या पैशावर डोळा आहे. देवस्थानांवर स्वतःच्या पक्षाशी संबंधीत लोकांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत मनमर्जीप्रमाणे निर्णय करून घ्यायचे. हे मोदी मॉडल राज्यात सुरु आहे. रिझव्र्ह बँकेच्या पैशावरती मोदी सरकार ज्या पध्दतीने डोळा ठेवून आहे. त्याचपद्धतीने महाराष्ट्रातील विविध देवस्थानांकडील पैशावर सरकारचा डोळा आहे. हे यातून स्पष्ट झाले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे.