मी फक्त वयाने मोठा; अशोक पत्की कामाने मोठे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अशोक पत्की यांनी  वयाच्या 79 व्या वर्षीही इतके काम करून ठेवले आहे की त्यांच्यापेक्षा चार वर्षे वयाने मी मोठा असूनही त्यांच्या तुलनेत पावपटदेखील काम करू शकलो नाही, त्यामुळे मला त्यांचा हेवा वाटतो. कलाकार वयाने म्हातारा होत असला तरी विचाराने कधीच म्हातारा होत नाही. वयाच्या शंभरीतदेखील आम्ही दोघेही तुमच्यापुढे त्याच उत्साहाने कार्यक्रम सादर करू, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सांगीतिक कारकीर्दीला रविवारी 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आणि त्यांच्या 79व्या वाढदिवसानिमित्त माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात आयोजित ‘तव स्पर्श अमृताचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याला शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांची यावेळी सन्माननीय उपस्थिती होती. याशिवाय शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार, सारस्वत बँकेचे किशोर रांगणेकर, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, निर्माते–दिग्दर्शक महेश टिळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, अलका कुबल–आठल्ये, अश्विनी पत्की, आशुतोष पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. मेघमल्हार आणि स्वरसा प्रस्तुत या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील पंडीत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले. यावेळी सुरेश वाडकर, अनिरुद्ध जोशी, अमृता दहिवेलकर आणि माधुरी करमरकर यांनी ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘दूर किनारा राहिला’, ‘राधा ही बावरी’ अशी पत्की यांची गाजलेली चित्रपट, नाटय़, मालिकांची शीर्षकगीते आणि जिंगल्स सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी निवेदिका स्मिता गवाणकर यांनी पत्की यांची प्रकट मुलाखत घेतली. यातून त्यांचा पाच दशकांचा सांगीतिक प्रवास उलगडला. 

 …अन् मी घडत गेलो! 

1969 साली माझी ओळख ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्याशी झाली. त्यांना पेटीवादक हवा होता. कामाची गरज असल्याने मी ऑडिशन दिली. पेटी ऐकून त्यांनी मला मॉनिटर बनवले. मला नोटेशन येत नव्हते. पण सतारवादक अरविंद मयेकर, अरेंजर श्यामराव कांबळे यांनी मला शिकवले असे अशोक पत्की यांनी सांगितले. 

पत्कीजींचा अमृतस्पर्श आम्ही 1972 सालापासून अनुभवतोय. आज येथे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा देखील सहवास लाभल्यामुळे साक्षात अमृताचा वर्षावच होतोय. चाल एका बोटाने वाजवता आली पाहिजे, त्यात गोडवा पाहिजे असे तुम्ही नेहमी सांगता. मुळात हा गोडवा तुमच्यातच आहे. भावगीतामधली झिंग आता संपत चालली असून सगळीकडे झिंग झिंगाट सुरू आहे. मात्र आपण जे इतक्या वर्षांत बनवलंय तो आजन्म ठेवा आहे. त्यामुळे आजच्या काळातही आपले सुगम संगीत आणि भावगीत ऐकायला प्रचंड गर्दी होते. महाराष्ट्र आणि जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांचे प्रेमरूपी आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. 

संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार