अशोक सराफ, देवकी पंडित आणि कलापिनी यांना ‘संगीत नाटक अकादमी’

शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक, लोकसंगीत अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांची आज घोषणा झाली. शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी 2022 या वर्षासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना, तर 2023 साठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. नाटय़ क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2022 या वर्षाचा  संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित झाला.

संगीत नाटक अकादमीने 2022-23 या दोन वर्षांचे  पुरस्कार बुधवारी घोषित केले. प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार आणि ढोलकीवादक विजय चव्हाण हेदेखील पुरस्काराचे मानकरी आहेत. एक लाख रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

80 युवा कलावंतांचा गौरव

अकादमीचे फेलोशिप (अकादमी रत्न) आणि उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार विजेत्यांची नावेही जाहीर करण्यात आलीउस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार 80 कलावंतांना मिळाला. यामध्ये अभिनेत्रा ऋतुजा बागवे, लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी, सरोदवादक सारंग कुलकर्णी, अभंग गायक नागेश अडगावकर आदींचा समावेश आहे. 25 हजार रुपये आणि ताम्रपट असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.