अफगाणिस्तानातून पलायन केलेले राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या भावाने केली तालिबानशी हातमिळवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अफगाणिस्तानच्या या परिस्थितीला राष्ट्रपती अशरफ गनी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. अमेरिकेनेही या परिस्थितीचे खापर गनी यांच्यावरच फोडले आहे. काबूलवर तालिबान्यांनी कब्जा करताच गनी यांनी अफगाणिस्तानातून पलायन केले आहे. त्यातच आता त्यांचा भाऊ हशमत गनी याने तालिबान्यांशी हातमिळवणी केल्याने अशरफ गनी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अफगाणिस्तानातील परिस्थितीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन जबाबदार असल्याचा आरोप करत अफगाणि नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमोर निदर्शने केली होती. त्यावेळी बायडन यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीला अशरफ गनी जबाबदार असल्याचे सांगत या परिस्थितीचे खापार त्यांच्यावरच फोडले आहे. अफगाणिस्तानातील जनतेला संकटात सोडून गनी यांनी पलायन केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

गनी यांनी देशातून पलायन केले आहे. ते सध्या युएईमध्ये आहेत. आपण अफगाणिस्तानात परतण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या बिकट परिस्थितीत त्यांचा भाऊ हशमन गनी याने तालिबान्यांशी हातमिळवणी केल्याने अशरफ गनी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुचिस ग्रँड काऊंसिलचे प्रमुख हशमत गनी यांनी तालिबानी नेते खलील उर रहमान आणि मुक्ती महमूद जाकीर यांच्या उपस्थितीत तालिबानला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.