मी पुन्हा तसंच करेन, ‘त्या’ ट्विटवरून आर. अश्विन आणि नेटकऱ्यांमध्ये रंगला सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू आर. अश्विन आणि नेटकरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर भिडले आहेत. सोशल मीडियावर एका युजरने टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात ते दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू पिटर कर्स्टन यांना ‘मंकड स्टाइल’ बाद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दोन लढतींची दृश्य आहेत. पहिल्या व्हिडीओत 1983 च्या वर्ल्डकप विजयाचे नायक कपिल देव हे पिटर कर्स्टन याला वॉर्निंग देताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते पिटर कर्स्टन याला ‘मंकड स्टाइल’ बाद करताना दिसत आहेत.

या व्हिडीओखाली एका युजरने केलेल्या कमेंटमुळे अश्विनची सटकली. कपिल देव यांनी पिटर कर्स्टन याला एकदा वॉर्निंग दिली आणि जंटलमन प्रमाणे क्रिकेट खेळले. तसेच त्यांनी कर्स्टनला क्रीझबाहेर जाण्यापासूनही रोखले नाही. ही खरी खेळ भावना आहे, अशी कमेंट एका युजरने केली. या युजरचा रोख आर. अश्विनकडे होता.

आर. अश्विने देखील या युजरला जशास-तसे उत्तर दिले आहे. जर एखादा फलंदाज क्रीझ बाहेर जाणार असेल तर मी मागे हटणार नाही, तसेच करणार. जर एखाद्या गोलंदाजाला फलंदाजाला अशा प्रकारे बाद करायचे असेल तर त्याची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. आणि हो याबाबत तू माझ्या पालकांना सागणार नाही, असे उत्तर अश्विनने दिले.

2019 च्या आयपीएल सत्रादरम्यान पंजाबचा तत्कालिन कर्णधार रवीचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला ‘मंकड स्टाइल’ धावबाद केलो होते. यामुळे बराच वाद झाला होता. परंतु अश्विनने मात्र जे नियमांमध्ये आहे तेच केल्याचे म्हटले होते.

काय आहे ‘मंकड स्टाइल’?

अशा पद्धतीने धावबाद करण्याला ‘मंकड स्टाइल’ धावबाद असे म्हटले जाते. हिंदुस्थानचे माजी कर्णधार विनू मंकड यांच्या नावावरून धावबाद करण्याच्या या अनोख्या शैलीला ‘मंकड स्टाइल’ म्हटले जाते. हिंदुस्थानचा संघ 1947 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी मंकड हे गोलंदाजी करीत असताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बिल ब्राउन यांनी क्रिज सोडली. मंकड यांनी ब्राउन यांना धावबाद केले. त्या वेळी मंकड यांच्यावरही टीका झाली होती. मात्र, डॉन ब्रॅडमन यांनी मंकड यांना पाठिंबा दिला होता. कारण, क्रिकेटच्या नियमात हे स्पष्ट पणे म्हटले आहे, की गोलंदाजाने चेंडू फेकण्याआधीच नॉन-स्ट्राइकच्या फलंदाजाने क्रिज सोडता कामा नये. आयसीसीचा नियम 41.16 मध्ये याचा उल्लेख आहे.