
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला नवी मुंबई पोलीस अद्यापही छुपी मदत करीत असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर जामीन मिळवण्यासाठी कुरुंदकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र हा प्रकार नवी मुंबई पोलिसांनी आपल्यापासून आणि अश्विनीच्या नातेवाईकांपासून लपवून ठेवला आहे, असे घरत यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अभय कुरुंदकर याला वाचवण्यासाठी जिवाचा मोठा आटापिटा केला. त्याचा मोबाईलही कळंबोली पोलिसांना ताब्यात घेता आला नाही. कुरुंदकरच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कळंबोली पोलीस ठाणे होते. पोलिसांच्या या हलगर्जीपणावर पनवेल न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढून तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि तत्कालीन उपायुक्त तुषार दोषी यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची अद्याप चौकशी झाली नाही, असे अॅड. प्रदीप घरत यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
कुरुंदकरने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाची माहिती मिळाल्यानंतर मी या गुन्ह्याचा इन्चार्ज असलेल्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी बोलावले. मात्र हा अधिकारी चर्चेला आला नाही आणि न्यायालयातही उपस्थित राहिला नाही.हा खटला अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती कागदपत्रे मिळणे गरजेचे आहे. यापुढे तसे झाले नाही तर ही बाब मी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे, असा इशाराही घरत यांनी दिला आहे.



























































