
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने धडाकेबाज सुरुवात करत रिंगमध्ये आपली ताकद दाखवली. प्रीती पवार आणि दीपक या दोघांनीही प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत विजयी सलामी ठोकली. महिलांच्या 54 किलो गटात वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्सची सुवर्णपदक विजेती प्रीती पवारने कझाकस्तानच्या एलिना बाजारोवाला 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत करत रिंगवर वर्चस्व गाजवले. अनुभवी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तिने दाखवलेले नियंत्रण आणि आक्रमक खेळ तिच्या पदकाच्या दाव्याला अधिक बळ देणारा ठरला.
पुरुषांच्या 70 किलो गटात दीपकने संयम आणि अचूक रणनीतीचा उत्कृष्ट मिलाफ साधत उझबेकिस्तानच्या खवासबेक असादुल्लायेववर 3-2 अशा फरकाने मात केली. बॉक्सिंगमधील बलाढय़ उझबेकिस्तानविरुद्ध मिळवलेला हा विजय हिंदुस्थानसाठी मोठा आत्मविश्वास देणारा ठरला.



























































