अमित, विकीला रौप्यपदक; महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कास्य पदकावर मोहोर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या कुस्तीपटूंनी बुधवारी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त कामगिरी करीत पाच पदकांवर मोहोर उमटवली. अमित धनकर, विकी यांचे सुवर्ण पदक हुकले. त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या राहुल आवारेसह दीपक पुनिया व सुमित मलिक यांनी कास्य पदकावर नाव कोरले.

अमित धनकर याने 2013 साली 66 किलो वजनी गटात चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता, मात्र यंदा त्याला 74 किलो वजनी गटात सुवर्ण पदकापासून दूरच राहावे लागले. कझाकस्तानच्या कैसनोव दनियारने अमित धनकर याला 5-0 अशा फरकाने पराभूत केले आणि सुवर्ण पदक जिंकले. इराणच्या करीमीने विकीला 92 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकाच्या लढतीत 11-0 अशा फरकाने पराभूत केले.

61 किलोत मराठी झेंडा

61 किलो वजनी गटात मराठी झेंडा फडकला. राहुल आवारेने या वजनी गटात कोरियाच्या किम जिनचा 9-2 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि देशासाठी कास्य पदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो 57 किलो वजनी गटात लढला होता. दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात, तर सुमित मलिकने 125 किलो वजनी गटात कास्य पदक पटकावले.

महिला पॉवर आज दिसणार

आता गुरुवारी तिसऱया दिवशी हिंदुस्थानी महिलांची ‘पॉवर’ तमाम कुस्तीप्रेमींना पाहायला मिळणार. सीमा (50 किलो वजनी गट), ललिता सेहरावत (55 किलो वजनी गट), मंजू (59 किलो वजनी गट), दिव्या काकरण (68 किलो वजनी गट) आणि पूजा (76 किलो वजनी गट) यांच्यावर हिंदुस्थानची मदार असणार आहे.