दोन सुवर्णांसह पदकांचा ‘षटकार’

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी पाच पदकांची कमाई करणाऱया हिंदुस्थानने दुसऱया दिवशी दोन सुवर्णांसह सहा पदके जिंकली. हिंदुस्थानला सोमवारी या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक नेमबाजीच्या रूपाने मिळाले. त्यानंतर हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघानेही अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर नेमबाजी व रोईंग या क्रीडा प्रकारात हिंदुस्थानला 2-2 कास्य पदके मिळाली.

नेमबाजीत विश्वविक्रमी सुवर्ण

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात हिंदुस्थानी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या जागतिक विक्रमाला गवसणी घालत पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि दिव्यांश पंवार या त्रिकुटाने व्यक्तिगत क्वालिफिकेशन राउंडमध्ये 1893.7 गुणांचा जागतिक विक्रम नोंदवीत हा सोनेरी पराक्रम केला. हिंदुस्थानी संघाची ही गुणसंख्या मागील माहिन्यात बाकू जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनने केलेल्या जागतिक विक्रमापेक्षा 0.4 गुणांनी अधिक आहे. तिसऱया फेरीपर्यंत हिंदुस्थानी त्रिकुट तिसऱया क्रमांकावर होते, तर चीन आघाडीवर होता.

मात्र चौथ्या फेरीत हिंदुस्थानने दमदार पुनरागमन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पात्रता फेरीमध्ये तिसऱया क्रमांकावर राहिलेल्या रुद्राक्ष 632.5 गुणांसह टीमसाठी सर्वाधिक गुणांची कमाई करणारा नेमबाज ठरला. त्यानंतर ऐश्वर्य 631.6 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला, तर दिव्यांशनेही 629.6 इतक्याच गुणांची कमाई केली. या स्पर्धेत दक्षिण कोरियाने रौप्य पदक, तर चीनने कास्य पदक पटकावले.

नेमबाजीत दोन कास्य पदके

ऐश्वर्य प्रताप सिंहने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात हिंदुस्थानला कास्य पदक जिंकून दिले. त्यानंतर 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात हिंदुस्थानला कास्य पदक मिळाले. विजयवीर सिद्धू, अनीश भनवाला व आदर्श सिंह वाली यांनी हिंदुस्थानला सोमवारचे अखेरचे पदक जिंकून दिले.

रोईंगमध्ये सलग दुसऱया दिवशी पदके

नेमबाजीतील पहिल्या सुवर्णपदकानंतर हिंदुस्थानला रोईंगमध्ये कास्य पदक मिळाले. आशीष, भीम सिंह, जसविंदर सिंह व पुनीत कुमार या चौकडीने पुरुषांच्या कॉक्सलेस रोइंगमध्ये देशाला हे पदक जिंकून दिले. त्यानंतर हिंदुस्थानला सोमवारचे तिसरे पदकही रोईंगमध्येच मिळाले. परमिंदर सिंह, सतनाम सिंह, जकार खान व सुखमीत सिंह या हिंदुस्थानी संघाने पुरुषांच्या क्वाड्रपल स्कल्स रोइंगमध्ये कास्य पदक जिंकले.