एशियन लीजेंड्स लीग जानेवारीत रंगणार

जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलेल्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा मैदान गाजवण्याची संधी मिळणार असून एशियन लीजेंड्स लीगचा चौदा दिवसांचा दुसरा हंगाम 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या हंगामात गल्फ ग्लेडिएटर्स आणि पाकिस्तान पँथर्स या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपने दिली.

या लीगमध्ये आयपीएलप्रमाणेच ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा नियम लागू केला जाणार आहे. तसेच गल्फ ग्लेडिएटर्स या संघात आखाती देश आणि सहसदस्य क्रिकेट राष्ट्रांमधील खेळाडू असतील. तर दुसरा संघ पाकिस्तान पँथर्स असेल, यात पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू असतील. एशियन लीजेंड्स लीग ही केवळ स्पर्धा नाही तर ती निवृत्त दिग्गज खेळाडूंसाठी आशिया चषक असल्याचे लीगचे प्रमुख मदनलाल यांनी सांगितले. तसेच ही स्पर्धा आशियाई क्रिकेटचा वारसा, भावना आणि महानता साजरी करणारी असल्याची भावना आकाश चोप्राने बोलून दाखवली.