
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अॅड. सरोदे यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने त्यांची सनद निलंबित केली. त्यानुसार अॅड. सरोदे हे तीन महिने न्यायालयात युक्तिवाद करू शकणार नाहीत.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये शिवसेनेने वरळीत ‘जनता न्यायालय’ भरवले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल अॅड. सरोदे यांनी सोप्या शब्दांत मांडला. तथापि, त्यांच्या विधानातून न्यायव्यवस्था, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अपमान झाला, अशी तक्रार भाजप कार्यकर्ता राजेश दाभोळकर यांनी केली.
संविधानासाठी काम करीत राहणार !
मी न्यायव्यवस्थेचा अपमान केलेला नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. मात्र शिवसेनेबाबत एक भूमिका घेतली आहे. मी उद्धव ठाकरे यांचा वकील असून त्यांची बाजू संवैधानिक आहे हे सातत्याने सांगत आलोय. शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळेच सनद निलंबनासाठी आताची तारीख निवडली गेली का? महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियापुढे आव्हान देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले
            
		





































    
    



















