
अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी देश, विदेशातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी लाखो लोकं अयोध्या नगरीत येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत रामाचे मंदिर उभे रहात असल्याने आसाम सरकारने हा दिवस ‘ड्राय डे’ घोषित केला आहे. 22 जानेवारीला संपूर्ण राज्यात दारुविक्री बंद असेल अशी माहिती पर्यंटन मंत्री जयंत मल्ल बरुआ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पर्यंटन मंत्री जयंत मल्ल बरुआ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यात ‘ड्राय डे’ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
‘ड्राय डे’ म्हणजे नेमके काय?
सरकार एखादा विशेष सण किंवा विशेष प्रसंगी संपूर्ण राज्यात दारुविक्रीवर बंदी घालते, तेव्हा त्या दिवसाला ‘ड्राय डे’ असे म्हणतात. ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असते. हा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई केली जाते. 1962 मध्ये पंजाबच्या उत्पादन शुल्क कायद्यात पहिल्यांदा ‘ड्राय डे’चा उल्लेख करण्यात आला होता. नंतर केंद्र सरकारने 1950 मध्ये संपूर्ण देशभरात लागू केला.
























































