हिंदुस्थानी क्रिकेट संघाला धमकी देणाऱ्या आसामी तरुणाला अटक

394

हिंदुस्थान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना ठार मारणारअसा धमकीचा मेल बीसीसीआयला पाठवून खळबळ उडवून देणारा अखेर सापडला. बीसीसीआयला धमकीचा मेल पाठवणारा तरुण आसामचा असून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने तेथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. ब्रजमोहन दास (19) असे त्याचे नाव असून त्याने असा मेल का केला, त्याचे कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

16 ऑगस्ट रोजी बीसीसीआयच्या कार्यालयात एक मेल आला. तो मेल वाचल्यानंतर सर्वांचीच पाचावर धारण बसली. कारण हिंदुस्थान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना ठार मारणार असल्याची धमकी त्या मेलद्वारे देण्यात आली होती. याबाबत तक्रार दाखल होताच एटीएस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मेल पाठविणाऱ्याचा तत्काळ शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक बाबींनी तपास करीत असताना आसामच्या मोरीगाव जिह्यातील शांतीपूर परिसरात राहणाऱ्या ब्रजमोहन या विद्यार्थ्याने तो धमकीचा मेल पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एटीएसच्या एका पथकाने तेथे जाऊन आसाम पोलिसांच्या मदतीने ब्रजमोहनला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. ब्रजमोहनला माझगाव कोर्टात हजर केले असता त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याने हे कृत्य का केले ते मात्र समजू शकले नाही.

अन्य क्रिकेट बोर्डांनाही धमकीचा मेल

बीसीसीआयला जो धमकीचा मेल केला होता तोच मेल ब्रजमोहनने पीसीबीसह अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डांनाही पाठविला होता. हिंदुस्थानच्या क्रिकेटपटूंना ठार मारणार असल्याचा तो मेल असल्याने अन्य बोर्डाने बीसीसीआयच्य निर्दशनास ही बाब आणून दिली होती. त्यानंतर लगेचच बीसीसीआयलादेखील तो धमकीचा मेल आला होता, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या