
सामना प्रतिनिधी । पणजी
दुचाकी आणि ऑटो रिक्षाला तिसऱ्या मांडवी पुलावर बंदी का याची कारणे सरकारने द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. दुचाकी आणि रिक्षांना या पुलाचा वापर का करू दिला जात नाही याचे उत्तर पारदर्शकतेच्या नावाखाली समजून घेण्याचा आमचा यत्न आहे, असे आम आदमी पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यांनी म्हटले आहे.
सामान्य आणि गरीब माणूस जो मोटरसायकल आणि ऑटो रिक्षाचा मुख्य वापरकर्ता आहे, त्याच्या विरुद्ध ही पोकळ घोषणा भेदभाव करणारी आहे, असा आरोप पाडगांवकर यानी केला आहे.
‘दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक जे सामान्य आणि गरीब लोक आहेत त्यांना कोणतेही कारण न देता मांडवी नदीवरील नवीन पुलाचा वापर करू न देणे हे अन्यायकारक आहे. हा पुल फक्त अति श्रीमंत आणि जुगारी लोकांना त्यांच्या पुड्डुचेरी रेजिस्ट्रेशन असलेल्या महागड्या गाड्या मोपातील ‘लास गोआस’ इथपर्यंत अतिवेगाने पळवता याव्यात याकारणास्तव बनवलेला आहे. दुचाकी व रिक्षावाला सामान्य सामान्य माणुस या सरकारसाठी तुच्छ आहे’, अशा शब्दात पाडगांवकर यांनी गोवा राज्य सरकारवर टीका केली.



























































