बारामती, धाराशिव, धुळे आणि कराडला दिवाळीपूर्वी ATCची व्यवस्था करण्यात यावी; मिलिंद नार्वेकरांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता सरकारने बारामती, धाराशिव, धुळे आणु कराड येथे दिवाळीपूर्वी एटीसीची आणि नाईट फ्लाइटची पूर्ण व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत राज्यापालांच्या अभिभाषणावर बोलताना केली. राज्यपालांनी याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

शिर्डी विमानतळ अत्याधुनिक करण्यासाठी केंद्राकडून भरीव आर्थिक मदत मिळवावी. शिर्डी विमानतळावर जागा असल्यास आणि तिथे कार्गोहब नसल्यास त्याची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली. क्रीडा धोरणाचा आराखडा करण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी. तसेच ग्रामीण भागात धावणे, कबड्डी, खोखोसाठी चांगले प्रशिक्षक मिळणे आवश्यक आहे त्याकरिता योग्य कार्यवाही करण्याकरिता राज्यपालांनी सूचना सरकारला देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई, ठाणे,पुणे, पनवेल, पालघर येथील 70 टक्के मैदाने खेळासाठी राखीव ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. मात्र, अद्याप ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता लवकरता लवकर हा प्रश्न सुटणे आवश्यक आहे, असेही नार्वेकर म्हणाले.