एटीएम फोडणाऱ्या परप्रांतीय टोळीला राजस्थानमधून अटक, अनेक गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॅकेचे एटीएम मशीन फोडून 56 लाखांची रोकड चोरणार्‍या दोन परप्रांतीय गुन्हेगारांना बुलढाणा पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. या गुन्हेगारांकडून अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात 30 जूनच्या रात्री गॅस कटरच्या सहाय्याने खामगाव व चिखली तालुक्यातील तीन बँकेचे एटीएम मशीन फोडून अज्ञात आरोपींनी जवळपास 56 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या गुन्ह्याच्या शोधासाठी बुलढाणा पोलिसांनी पाच पथके तयार करून गुन्ह्याचा सखोल शोध घेऊन राजस्थानातून दोघांना अटक केली आहे. या आरोपींनी या आधीही काही ठिकाणी अशाच प्रकारे एटीएम मशिन्स फोडून चोरी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. अशा प्रकरच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात बुलढाणा पोलिसांना यश आले असून राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी जवळून पंधरा लाखाची रोकड जप्त करण्यात आली असून इतर पैसे त्यांनी काही बँकेमध्ये वर्गीकृत केले आहे. ते सहा अकाउंट सीज करण्यात आल्याची माहितीही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविद चावरीया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींनी राज्यात इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.