
येत्या काही दिवसांत एटीएममधून पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. हा नवा नियम सध्याच्या पाच मोफत व्यवहारांमध्ये समाविष्ट असणार नाही. हिंदुस्थानी रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्काच्या समिक्षेबाबत जून महिन्यांत एक समिती नेमली होती, या समितीने आपल्या शिफारशी बँकेकडे सोपवल्या आहेत. एटीएममधून एकाच वेळी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास ग्राहकाला 24 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. सध्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करता येऊ शकतात. त्यानंतर जर त्याच महिन्यात सहावा व्यवहार झाला तर त्यावर ग्राहकाला 20 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. आरबीआयने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार आठ वर्षांनंतर एटीएमच्या शुल्कामध्ये बदल होऊ शकतो.




























































