आत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील

9

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

प. पू. आत्मा मालिक माउलींनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या रूपाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ते केवळ माऊलींच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. या संकुलात असंख्य मुले, मुली आनंदाने शिक्षण घेत आहे. पहिले कुटुंबाचे संस्कार मुलांवर व्हायचे पण आत्मा मालिकच्या मुलाचे संस्कार कुटुंबावर होवून अनेक कुटुंब तयार झाले आहे. म्हणूनच आत्मा मालिक ध्यानपीठ हे देशातील सर्वात महत्वाचं संस्कार केंद्र आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. त्यांनी गुरूपौर्णिमा महोत्सवामध्ये प. पू. आत्मा मालिक माऊलींची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, प.पू. आत्मा मालिक माऊलींचे दर्शन झाले की एक वेगळी ऊर्जा मिळते. येथे निस्वार्थपणे व अविरतपणे जनकल्याणाचा वसा घेवून काम सुरू आहे. धकाधकीच्या जीवनात विसावा घ्यावा वाटतो. याठिकाणी मायेचा ओलावा सद्गुरूंचे आशीर्वाद आहे. हे विसाव्याचे ठिकाण आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाने जो वारसा जपला आहे त्याला पुढे घेवून जाण्याची शक्ती येथून मला मिळते. आलेल्या सर्व भाविकांच्या मनोकामना सद्गुरू नक्कीच पुर्ण करतील असा विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करताना माझ्या हातून कोणतीही चूक घडू देवू नका असे साकडे त्यांनी प. पू. आत्मा मालिक माऊलींना घातले. आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये 14 जुलै पासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवासाठी हजारो भाविकांनी आपली उपस्थिती देवून सद्गुरू दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

दरम्यान, मंगळवारी 15 रोजी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिक्षक मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आदि मान्यवरांनी सद्गुरूंची भेट घेतली. आज दिवसभरात नायगांव सत्संग मंडळ यांनी काकड आरती व भजने सादर केली. पद्मश्री प्रलाहाद टिपानिया राजस्थान यांनी भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला. त्याचबरोबर मनमाड गुरूद्वारातील भजनी मंडळाने आपले भजने सादर केली. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांबच्या माध्यमातून कलाप्रदर्शन करत उपस्थितांची वाहवा मिळविली. तसेच संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, केदारची सारडा (इंदौर) यांनी आपल्या प्रवचनातून गुरूमहती भाविकांना सांगितली.