एटीएसच्या रणरागिणी! कुख्यात डॉनने महिला पोलिसांसमोर टेकले गुडघे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गांधीनगर

जे चित्र एखाद्या चित्रपटात दिसू शकतं ते चित्र गुजरातमध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळालं आहे. एका कुख्यात डॉनला चकमकीत गुडघे टेकायला लावण्याची साहसी कामगिरी गुजरात एटीएसच्या महिला पोलिसांनी करून दाखवली आहे. भल्या भल्या पोलिसांना शह देऊन पळून गेलेल्या या डॉनला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकत गजाआड केलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जुसब अल्लारख्खा असं या डॉनचं नाव आहे. गुजरातमधील जूनागढ आणि आसपासच्या परिसरात जुसबची दहशत होती. हत्या आणि दरोड्यासाठी कुख्यात असलेल्या जुसबच्या नावावर एका पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचाही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलिसांसाठी जुसब डोकेदुखी ठरला होता.

रविवारी पोलिसांना तो बोटाद येथील जंगलात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार गुजरात एटीएसच्या एका पथकाने त्याचा माग काढला. या पथकात एटीएसच्या साहसी महिला अधिकारी होत्या. अत्याधुनिक हत्यारांच्या साहाय्याने या महिला पोलिसांच्या पथकाने जुसबच्या टोळक्यावर कारवाई केली. काही काळ चकमक झाल्यानंतर महिला पोलीस मागे हटत नाहीत हे पाहून जुसब पोलिसांना शरण आला. महिला पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला गजाआड केलं. भल्याभल्यांना जेरीला आणणाऱ्या या डॉनला अटक केल्याबद्दल या महिला अधिकाऱ्यांच्या पथकाचं सर्वत्र कौतुक होत आहे.