जामखेडमध्ये रानडुकराचा हल्ला; दोनजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड तालुक्यातील साकत येथे रानडुक्करांच्या हल्ल्यात दोनजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहा महिन्यात रानडुकरांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे. त्यामुळे परीसरात दहशत निर्माण झाली आहे.

साकत येथील नागनाथ त्रिंबक अडसूळ शेतात पेरणी करत आसताना अचानक जाळीतून रानडुक्कर आले आणि अडसूळ यांना धडक देऊन खाली पाडले. त्यांचे भाऊ रमेश अडसूळ व शहाजी अडसूळ पळत आले व डुकराला चाबकाने हुसकावले. तोपर्यंत त्यांना डुकराचा दात लागल्याने त्रिंबक गंभीर जखमी झाले. त्यांचा गाल फाटला आहे. तसेच हातालाही जखम झाली आहे. त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. युवराज खराडे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. अडसुळ यांच्या तोंडाला पंधरा टाळे पडले आहेत.

सोमवारी सकाळी त्याच शिवारात मंगल अडसुळ गुरे सांभाळत आसताना अचानक एका रानडुक्करांने त्यांना धडक दिली. शेजारी तातडीने मदतीला धावल्याने त्यांची सुटका झाली. सहा महिन्यात साकत येथे रानडुकरांनी केलेला हा तिसरा हल्ला झाला आहे. सोजरबाई वराट या अद्यापही रानडुक्करांने केलेल्या हल्ल्यामुळे जाग्यावरच पडून आहेत. तसेच प्रल्हाद वराटही गंभीर जखमी झाले होते. सहा महिन्यात तिघांवर हल्ला झाल्याने परीसरात दहशत निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पवार के. आय., भाऊसाहेब भोगल यांनी पाहणी करून वरीष्ठांना कळवले आहे.

दुष्काळी परिस्थितीनंतर आता पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. मात्र, रानडुराच्या भीतीने शेतकरी पेरणीसाठी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. एकट्याने फिरणे धोकादायक झाले आहे. वनविभागाने रानडुक्करांचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.