राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभ्या असलेल्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. दगडफेक झाली तेव्हा गाडीमध्ये ड्रायव्हर होता, राजेश टोपे हे घटनास्थळी उपस्थित नव्हते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू असून यासाठी राजेश टोपे हे येथे आले होते. याचवेळी बाहेर उभ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये गाडीच्या काचा फुटल्या असून गाडीमध्ये एक लाकडी दांडा आणि काचेची बाटली सापडली आहे.

दगडफेकीची माहिती मिळताच राजेश टोपे समर्थक घटनास्थळी जमले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. दोघेही बिनविरोध निवडून आले, पण काही अंसुष्टांनी दगडफेक केली आणि यात गाडीची काच फुटली. या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी पोलिसांना केली आहे.

दगडफेकीमध्ये कोणाला इजा झालेली नाही. मात्र ही घटना घडली तेव्हा गाडीमध्ये एकटा ड्रायव्हर होता. त्याच्या जिवावर बेतले होते. आम्ही निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असताना ही घटना घडली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच यात मराठा आंदोलकांचा सहभाग नसून जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे टोपे यांनी सांगितले.

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक