
बांगलादेशची राजधानी ढाका शहरात गुरुवारी रात्री हिंदूंच्या इस्कॉन राधाकांता मंदिरावर हल्ला झाला. तब्बल 200 जणांच्या जमावाने अचानक आत घुसून मंदिराची तोडफोड केली, तसेच भाविकांच्या सामानाची लुटालूट केली. रात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी हा धुडगूस घातल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्ल्यात अनेक हिंदू भाविक जखमी झाले आहेत. हिंदुस्थानने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
बांगलादेशची लोकसंख्या 16.5 कोटी असून त्यात नऊ टक्के हिंदू आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत येथील हिंदू आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले वाढले आहेत. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात अनेक मंदिरांवर हल्ले केले गेले होते. त्यावेळीही ढाक्यातील इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला होता.
ढाक्याच्या वारी परिसरातील 222 लाल मोहन साहा स्ट्रीटवर उभारलेल्या इस्कॉन राधाकांता मंदिरावर हा हल्ला झाला. गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास हाजी सैफुल्लाह यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक लोक मंदिरात घुसले. त्यांनी भाविकांना बाजूला ढकलून देत मंदिराची तोडफोड तसेच सामानाची लुटालूट केली. हल्लेखोरांनी भाविकांना मारहाणही केली. त्यात अनेकांना दुखापत झाली आहे. होळीच्या एक दिवस आधी हा हल्ला झाल्याने हिंदू धर्मीयांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. हा हल्ला गंभीर चिंतेचा विषय असून बांगलादेश सरकारने हिंदूंना सुरक्षा पुरवावी व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारामन दास यांनी केली आहे. तसेच हिंदुस्थान सरकारने कारवाईसाठी बांगलादेशच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला आहे.






























































