
सामना प्रतिनिधी । नागपूर
नागपूर जिल्हयाच्या जलालखेडा येथून जवळच असलेले आरंभी, रामठी, हिवरमठ गावाच्या शिवारात कड नदीच्या काठावर एका विशेष समुदायाकडून अवैध दारूची निर्मिती करून जवळपासच्या गावात व नदी पलीकडे असलेल्या वर्धा जिल्ह्यातील गावात विक्री केली जाते. पोलिसांना अनेकदा निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आरंभी येथील सरपंच नरेश गोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केला. त्यासाठी मंगळवारी सकाळी 10.30 वाजता शिवारामध्ये सुरु असलेल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्याकरिता गेले असता अवैध दारू विक्रेत्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरपंचासह काही ग्रामस्थ जखमी झाले. दारूविक्रेते ग्रामस्थांविरोधात तक्रार करण्याकरिता गेल्यामुळे वातावरण चिघळले. रामठी, आरंभी व हिवरमठ येथील 200 ते 300 महिला व पुरुष जलालखेडा पोलीस ठाण्यात पोहचले. त्यामुळे काहीकाळ जलालखेडा पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु काटोल पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, नरखेड प.स. चे सभापती राजेंद्र हरणे व प.स सदस्य प्रवीण जोध यांनी परिस्थिती हाताळल्याने तणाव निवळला.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारी देऊनही पोलिसांकडून कारवाई केली नसल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगितले. नरेश गोरे व ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सुनील बावरी, चंदासिग बावरी, सुंदर सिंग बावरी, अजय सिंग बावरी व इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर समंदर कौर चंदा सिंग बावरी यांच्या तक्रारीवरून सरपंच नरेश गोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.































































