
मशिदीच्या दिशेने लाऊडस्पीकरवर गाणे लावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परळी वैजनाथ येथे तैनात ‘रेल्वे सुरक्षा दल’च्या उपनिरिक्षकाविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेस्टेशन, हमालवाडा येथील अमृत साई प्लाझा बिल्डींगमधील किशोर गंडप्पा मलकुनाईक (40) रेल्वे सुरक्षा दलात असून ते परळी वैजिनाथ येथे उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. मलकुनाईक यांनी शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घरात लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजाने गाणे लावले होते. दाखल गुन्ह्यानुसार, मशिदीत नमाज पठणाची वेळ असताना मोठ्याने लाऊडस्पीकरवर गाणे लावून दोन समाजात तेढ निर्माण व्हावा या उद्देशाने लाऊडस्पिकरचे तोंड हे सफा मशिदीच्या दिशेने केले. नमाज पठणाच्या वेळी मशिदीच्या दिशेने सोसायटीतून मोठ्या आवाजाने गाण्याचे आवाज येत असल्याने परिसरात काही काळ तनाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्याचे कारभारी नामदेव नलावडे यांच्या तक्रारीवरून उपनिरिक्षक किशोर गंडप्पा मलकुनाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात जातीय व अन्य प्रकारची तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून, दोन दिवसांपूर्वी यू ट्युब चॅनलच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी यूट्युब चॅनलचा मालक आणि अँकर विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली होती.


























































