वीज मंडळाचा पालकमंत्र्यांना शॉक, अर्धा तास ध्वजारोहण रखडले

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त इलेक्ट्रिक बटण दाबून ध्वजारोहण करणार्‍या गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांना वीजवितरण कंपनीने जोरदार शॉक दिला. ध्वजारोहणासाठी बटण दाबताच वीज गुल झाल्यामुळे ध्वजारोहण तब्बल अर्धा तास उशिराने झाले. वीज बील थकल्याने कापलेली वीज परस्पर जोडल्यामुळे हा प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सरकारचे पितळ उघडे पडले आहे.

वसमत रोडवरील राजगोपालाचारी उद्यानात ध्वजारोहण सोहळ्यासाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, शिवसेना खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा आदींची उपस्थिती होती.

बटण दाबताच वीज गुल
या ठिकाणी ४० फूट उंच खांबावर विजेवर चालणार्‍या यंत्रणेद्वारे हा तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार होता. सर्व तयारी झाली होती. मंत्री सावे बटण दाबणार तोच वीज गुल झाली. मंत्री सावे यांनी पुन्हा पुन्हा बटण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, ध्वज काही केल्या वर सरकत नव्हता.

प्रशासनाची धावाधाव
हा प्रकार पाहून सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह जिल्हाधिकारी गावडे यांची धावाधाव सुरू झाली. मंत्री सावे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना फोन लावण्यास सांगितले. संबंधित अधिकार्‍याने फोन घेताच त्याची कानउघाडणी करून तात्काळ हजर होण्याच्या सूचना दिल्या. शिवाय मंत्री सावे यांनी आयुक्त सांडभोर यांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर झेंडा फडकला.

अनधिकृत विद्युत कनेक्शन
राजगोपालाचारी उद्यानाकडे महावितरणची 29 हजार रुपये थकबाकी असल्यामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला होता. महानगरपालिकेने थकबाकी न भरता स्वत: अनधिकृत खांब उभा करून तार ओढून जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाकडून अनधिकृत वीजपुरवठा घेतला. मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महावितरणला रीतसर पत्र देऊन याविषयी कळवलेसुद्धा नव्हते. त्यामुळे अचानक वीज गुल झाली आणि सोहळ्याचा पचका झाला. राजगोपालाचारी येथील दोन डीपींवर महावितरणचे कर्मचारी तैनात होते. मात्र, त्यांना या शासकीय वीजचोरीची माहिती नसल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा रंगली होती.