
रत्नागिरी जिल्ह्यात ऑडिओलॉजिस्ट नसल्यामुळे कर्णबधिरांना तपासणी प्रमाणपत्रासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरस येथे पाठवण्यात येते. कर्णबधिरांची आरोग्य विभागाकडून होणारी अवहेलना थांबवावी. महिन्यातून एक दिवस ऑडिओलॉजिस्टला रत्नागिरीत बोलावून कर्णबधिरांना तपासणी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि ऑडिओलॉजिस्टचे जे काही मानधन असेल ते आरोग्य विभागाने द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हापरिषद सदस्य संतोष थेराडे यांनी आज आरोग्य समितीच्या बैठकीत मांडली.
आजच्या आरोग्य समितीच्या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव आणि संतोष थेराडे यांनी आरोग्याचे अनेक प्रश्न मांडले. रूग्णवाहिका चालकांना १८ हजार रुपये पगार आहे. मात्र, त्यांच्या हातात १२ हजार रुपयेच पगार मिळतो असे संतोष थेराडे आणि विक्रांत जाधव यांनी सांगितले. रूग्णवाहिका चालकांच्या पगारासंदर्भात एक बैठक आयोजित करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिले. सफाई कामगारांनाही १५ हजार पगार आहे मात्र त्यांच्या हातात ७ हजार रुपये पगार मिळतो, असा आरोप संतोष थेराडे यांनी केला. जिल्हा परिषद सदस्या पुजा निकम यांनी अर्धवट बांधकाम असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मांडताना आरोग्य केंद्राच्या इमारती तात्काळ पूर्ण करा आणि आम्हाला फक्त इमारती नकोत तर चांगले डॉक्टर द्या, अशी मागणी केली.






























































