
सामना ऑनलाईन, मुंबई
पालिकेच्या शिक्षण विभागाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी थर्ड पार्टी ‘नॅबिट’ संस्थेकडून ऑडिट करण्यात येणार आहे. एका महिन्यात हा अहवाल सादर झाल्यानंतर तातडीने या वर्षीपासूनच शिक्षण पद्धतीत आवश्यक सुधारणा आणि बदल करण्यात येणार असल्याचे शिवसेना नेते– युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले. आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागासोबत बैठक घेतल्यानंतर ही माहिती दिली.
पालिकेच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांना 27 वस्तू मोफत दिल्या जात असून ‘बेस्ट’ बस पास, नव्या शाळांची बांधणी-शाळांच्या दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. असे असले तरी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आणखी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण पद्धतीत आवश्यक असणारे बदल करण्यासाठी थर्ड पार्टीकडून ऑडिट करून आवश्यक सुधारणा करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. पालिका शाळांचा दहावीचा घटलेला निकाल वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करणार असल्याचेही ते म्हणाले. यामध्ये आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांना जादा क्लास, शिक्षकांना अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचे ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पालिका शाळांमधील बाथरूम, कॅण्टीन स्वच्छ करण्यासाठी एनजीओ, एजन्सीची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक रुग्णालयांमध्ये दुरुस्ती काम सुरू असल्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करणे, पुरेसा औषध पुरवठा करणे यावर बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, मंगेश सातमकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आदी उपस्थित होते.
सध्या पावसाळा तयारी, दुष्काळ निवारणाला प्राधान्य
विधानसभा निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी सध्या दुष्काळ निवारण आणि पावसाच्या तयारीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. पावसाळापूर्व कामांच्या आढाव्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थित बैठक पार पडली असून पावसाळ्यासाठी पालिकेने उत्तम तयारी केली असून पाणी तुंबणार नाही अशी आशाही व्यक्त केली. मात्र मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोसारख्या अनेक इफ्रास्ट्रक्चरच्या कामांमुळे पाणी साचण्याची शक्यता असली तरी पालिकेने आवश्यक त्या ठिकाणी पुरेशा पंपांची व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले.
पालिका शाळांत प्रवेशासाठी रांगा लागल्या पाहिजेत
पालिकेच्या 1230 शाळांमध्ये तीन लाखांवर विद्यार्थी नऊ माध्यमातून शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे डेंटल केअर, मेंटल केअर घेतले जात आहे. तरीदेखील निकालाची घसरण का झाली याचा शोध घेण्याची गरज आहे. इंटरनल गुण बंद झाल्यामुळे निकाल घटला असल्याचे दिसत असले तरी इतर कारणे शोधण्याचीही गरज आहे. यासाठी एनजीओ, सामाजिक संस्थांची मदत घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पालिका शाळांबाहेर ऍडमिशनसाठी रांगा लागल्या पाहिजेत असे आपले स्वप्न असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.





























































