
काही दिवसांपूर्वी संभाजीनगर शहरात एका दिवशी राज्य राखीव पोलीस दलाचे 74 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली होती. या जवानांपैकी 67 जवान मंगळवारी कोरोनामुक्त झाले. ही शहरासाठी दिलासादायक बाब ठरली आहे.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 सातारा परिसर येथील 93 पोलीस अधिकारी व कर्मचारी मालेगांव बंदोबस्तावरुन परत आल्यानंतर त्यांना श्रेयश इंजिनियरिंग कॉलेज सतारा परीसर येथे आयसोलेशन करण्यात आले होते. त्यानंतर 8 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यामधील 74 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. तसेच त्यांचेवर शहरातील म.न.पा.वैद्यकीय अधिकारी डॉ. पडळकर व सातारा परीसारातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुणे त्यांचे वैद्यकीय पथकासह तसेच गट रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास वाव्हळे, औषध निर्माता राजेंद्र बोन्हाडे, सुनिल सुर्यवंशी, मुकेश कासट यांनी सदर कोरोना पॉझीटिव्ह पोलीस कर्मचारी यांचेवर आजपावेतो उत्तम औषधोपचार केला असुन आज ६७ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना आजारावर मात केली आहे.
श्रेयश इंजिनियरिंग कॉलेज सातारा परीसर येथे आयसोलेशन करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राहण्याची व इतर सोयी-सुविधा पुरविण्याकरिता सहा. समादेशक आय. एस. शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल. एस. सपकाळ, आर. ए. राऊत पोलीस उप-निरीक्षक व्ही. के. राऊत, पठाण व इतर जवानांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.































































