
रस्त्यावरील कुत्र्यांच्या अनाथ पिलांसाठी महापालिकेने दत्तक योजना जाहीर केली आहे. ही योजना राबवण्यासाठी महापालिकेला ‘आपला’ (पेट लव्हर्स असोसिएशन) चे सहकार्य लाभणार आहे. नागरिकांनी या योजनेत सहभागी व्हावे व कुत्र्यांच्या निराधार पिल्यांना आधार द्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले.
महापालिका आणि आपला या दोन संस्थांनी मिळून कुत्र्यांच्या पिलांसाठी दत्तक योजना आणली आहे. ही योजना आणताना आठ प्रकारची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली. पहिले उद्दिष्ट म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथ पिलांचा जीव वाचवणे हेच आहे. दत्तक योजनेमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे जखमी होणाऱ्यांचे प्रमाणदेखील कमी होईल. दत्तक घेतलेली कुत्र्यांची पिले आपल्या घरातील लहान मुलांसाठी विरंगुळा तर ठरू शकतातच पण त्याचबरोबर त्यांच्या वाढत्या वयातील मानसिक गरजादेखील भागवू शकतात, कुत्रा हा प्रेम करणारा, जिव्हाळा लावणारा प्राणी आहे. दत्तक योजनेमुळे शहरात प्रशिक्षित किंवा केलेल्या सूचना ऐकणाऱ्या कुत्र्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. अॅनिमल बर्थ कंट्रोल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देखील ही योजना प्रभावी ठरणार आहे़ त्यामुळे शहराची वाटचाल झिरो रेबिजच्या दिशेने होईल, असे डॉ. नाईकवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासकांनी घेतली दोन कुत्र्यांची पिले दत्तक
या दत्तक योजनेची सुरुवात मनपाचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वत:पासून केली. त्यांनी कुत्र्याच्या दोन पिलांना दत्तक घेतले आणि ही दोन पिले आपल्या लहान मुलाला भेट म्हणून दिली. यावेळी डॉ. नाईकवाडे यांच्यासह आयमन पाण्डेय, मोनिका काळे, मासूम सय्यद आदी उपस्थित होते.





























































