संभाजीनगरमधील पाचोड परिसरात ढगफुटी, गल्हाटी नदीला दुसऱ्यांदा पूर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठ दिवसांपासून संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, मंगळवारी ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र वाताहत निर्माण झाली होती. सखल भागांत राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकास मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत वाट काढावी लागली. तर गलाठी नदीने रौद्ररूप धारण केल्याने पाचोड खुर्द गावचा संपर्क तुटला होता. गेल्या पंचवीस वर्षांनंतर प्रथमच गलाठी नदीच्या पुलाला पाणी लागले.

गेल्या आठ दिवसांपासून संततधार पावसाने पाचोडसह परिसराला झोडपून टाकले असतानाच पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळ होता होता पावसाने रौद्ररूप धारण करत विजेच्या कडकडाटांसह तुफान पाऊस बरसला. काही तासांत ढगफुटी सदृश पाऊस बरसला. धुळे- सोलापूर रस्त्यावर अक्षरश: गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागले. घराघरांत, दुकानांत पाणीच पाणी साचले होते. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेले असून, कापूस, तूर, मूग, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर गेल्या पंचवीस वषांतील गलाठी नदीचा रेकॉर्ड मोडला गेला.

खंडाळा  परिसरात मुसळधार पावसाने सुरुवात केली असून, दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. सततच्या पावसाने लाल कांद्याचे नुकसान होणार आहे, कांदा लावलेले वाफे काठोकाठ भरले होते. वाफेतील पाणी जिरत नाही तोच पावसाला सुरुवात होत आहे. परिसरातील पाझर तलाव फुल्ल होत आहे.