
अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर नागपूर कसोटीत दोन्ही डावांत अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन नाराज झाले आहे. वॉर्नरला संघातून डच्चू देण्याचा कर्णधार पॅट कमिन्स व संघ व्यवस्थापन विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया -दरम्यानचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना दिल्लीमध्ये 17 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. येथील खेळपट्टीही फिरकीधार्जिणी वाटल्यास ऑस्ट्रेलियन संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची योजना आखत आहे. त्यामुळे क्वीन्सलॅण्डचा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमनला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. राखीव लेगस्पिनर म्हणून ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल स्वेपसनचा समावेश केला होता, मात्र त्याच्या पहिल्या अपत्याच्या जन्मामुळे तो मायदेशी परतला आहे. त्यामुळे कुहनेमनच्या कसोटी पदार्पणाची शक्यता बळावली आहे.
ऑस्ट्रेलियन मीडिया ‘द एज’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन संघाच्या एका सूत्राने त्याला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, नागपूर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत डेव्हिड वॉर्नर अपयशी ठरल्यानंतर त्याला संघातून वगळण्याचा विचार केला जात आहे. नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वॉर्नरने 1 आणि दुसऱया डावात केवळ 10 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज कुहनेमनने नुकत्याच संपलेल्या बिग बॅश लीगच्या मोसमात चांगली कामगिरी केली होती. त्याने 18 सामन्यांत 16 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ‘अ’ संघाने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा त्यावेळीही कुहनेमनने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या मॅट कुहनेमनने 34 च्या सरासरीने 32 विकेट घेतल्या आहेत. मात्र कॅमेरून ग्रीन पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास तो संघात परतू शकतो, तर कुहनेमनचे स्वप्न भंगू शकते.



























































