हिंदू मंदिरांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा मोदींना शब्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू मंदिरांवर सतत हल्ले होत आहेत. हिंदुंच्या धार्मिक स्थळांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी मोठे विधान केले आहे. मंदिरांवर हल्ला करणाऱ्या सोडणार नाही, असा शब्द त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले. हिंदुस्थानचा तीन दिवसीय दौरा आटोपण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.

ऑस्ट्रेलियामध्ये सर्वधर्मियांच्या आस्थांचा सन्माम केला जातो, त्यामुळे धार्मिक इमारतींवर होणाऱ्या हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. मग ते हिंदू मंदिर असो किंवा चर्च किंवा मशिद, असेही ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस म्हणाले.

धार्मिक इमारतींवरील हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर सुरक्षा यंत्रणांची मदत घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. मी त्यांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी) शब्द दिलाय की ऑस्ट्रेलियामध्ये सर्वधर्माच्या लोकांच्या आस्थेचा सन्मान राखला जाईल. आम्ही अशी अतिरेकी कृत्य आणि धार्मिक इमारतींवर होणारे हल्ले मग ते हिंदु मंदिरे असोत किंवा मशिद किंवा चर्च असोत खपवून घेणार नाही. ऑस्ट्रेलियात अशा कृत्याला थारा नाही आणि हे घडू नये यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांद्वारे शक्य तो प्रयत्न करू. याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही. आपण सहिष्णु बहुसांस्कृतीत राष्ट्र आहोत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, हिंदुस्थान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा उठवला होता. हिंदुस्थानी समुदाया ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात मंदिरांवर सातत्याने हल्ले होत असल्याच्या बातम्या येत असून ही खेदाची बाब असल्याचे मोदींनी म्हटले होते.

ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर हल्ले

– मेलबर्नमधील अल्बर्ट पार्क येथे असलेल्या हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. खालिस्तानी समर्थकांकडून हा हल्ला करण्यात आला होता. मंदिराच्या भींतीवर खालिस्तानी समर्थकांनी हिंदुस्थानविरोधी मजकूरही लिहिला होता.

– त्याआधी 17 जानेवारी रोजी खालिस्तानी समर्थकांनी व्हिक्टोरिया येथील शिव विष्णू मंदिरावर हल्ला केला होता.

– याआधी 12 जानेवारी रोजी मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरावर हिंदुस्थानविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.