मी थकलोय! ऑस्ट्रेलियाच्या हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरचे अजब विधान

ऑस्ट्रेलियाच्या हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी पाहुण्या संघाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने एक अजब विधान केले आहे. 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिंदुस्थानविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपण थकलो असल्याचे म्हटले आहे. 36 वर्षीय वॉर्नर हा झिम्बाब्वे, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा समावेश असलेल्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळला. T20 विश्वचषक खेळण्याव्यतिरिक्त वॉर्नर बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सकडून सहा सामने खेळला.

वॉर्नरने ‘क्रिकबझ’ला सांगितले की, “हा दौरा माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. मी खूप थकलो आहे. मला अजून एक रात्र कुटुंबासोबत घरी राहायला आवडलं असतं. पण ते तुमच्या हातात नाही”.

दरम्यान वॉर्नरने आपल्या 100व्या कसोटीत द्विशतक झळकावून पुनरागमन केले. सिडनी थंडर्ससाठी 20 चेंडूत नाबाद 36 धावा करताना तो उत्तम फॉर्ममध्ये दिसत होता. तो म्हणाला की, “मी थंडर्स संघात ऊर्जा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यंदाचा सिझन चांगला राहिला नाही. पण मला आशा आहे की पुढच्या वर्षी मी आतापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे खेळेन.