
जागतिक स्नोबोर्ड चॅम्पियनशिप स्पर्धा दोन वेळा जिंकणारा खेळाडू अॅलेक्स पुलिन (Alex Pullin) याच्या प्रेयसीने धक्कादायक दावा केला आहे. प्रियकराच्या मृत शरीरातून शुक्राणू काढून आपण गरोदर राहिल्याचा दावा एलिदा व्लग (Ellidy Vlug) हिने केला आहे. पुलिन याचे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टवर स्पीयरफिशिंग स्पर्धेवेळी निधन झाले होते.
विंटर ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेला अॅलेक्स पुलिन आणि एलिदा व्लग हे आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही दोघे बाळाची स्वप्ने पाहात होतो, परंतु अशी घटना आमच्या आयुष्यात कधी घडेल असे आम्हाला वाटत नव्हते. त्यामुळे अॅलेक्सचा जुलै 2020 मध्ये दुर्घटनेत बळी गेल्यानंतर त्याच्या मृत शरीरातून शुक्राणू काढण्याचे मी डॉक्टरांना सांगितले, असे एलिदाने सांगितले.
दरम्यान,आता एक वर्षानंतर एलिदा गर्भवती असल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामद्वारे दिली आहे. तसेच यावर्षी ऑक्टोबरमध्ये ती अॅलिसच्या बाळाला जन्म देणार असल्याचेही तिने सांगितले.
एलिदा इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘अॅलेक्स आणि माझे बाळ ऑक्टोबरमध्ये जन्माला येत आहे. मी आणि अॅलेक्सने गेल्या वर्षीच बाळाची तयारी केली होती. परंतु त्याच्या मृत्यूनंतरचा प्रवास खूपच आव्हानात्मक आणि खडतर होता. पण आता मला खूपच चांगले वाटतेय. अॅलिसचा मृत्यू होण्याआधी तो बाळ होण्याची वाट पाहात होता. त्याकरिता आयव्हीएफ तंत्राचा वापर करण्याचाही विचार आम्ही करत होतो. मला अॅलेक्सची खूप आठवण येते, पण आता त्याचे बाळ हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठे गिफ्ट आहे. गेल्या एक वर्षात माझ्यासोबत जे घडले त्यावर माझा विश्वासच बसत नाही.’
























































