प्रसिद्ध समीक्षक डॉ. किशोर सानप यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. किशोर सानप यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून नागपूरच्या निरामय या त्यांच्या मुलीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी मानेवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, भावंडे असा परिवार आहे.

एक व्यासंगी समीक्षक म्हणून किशोर सानप यांची साहित्य विश्वात ओळख होती. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ‘पांगुळवाडा’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीने ते प्रकाशझोतात आले होते. त्यांनी गोंदिया येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. 2017 ला धाराशीव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली होती. त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते दूरच राहिले. पुढे 2023 मध्ये गुरुकुंज येथे झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या डॉ. सानप यांनी स्वबळावर वाटचाल करीत साहित्य विश्वात नाव कमावले. वर्ध्यातील गो. से. वाणिज्य महाविद्यालय मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली. निवृत्तीनंतर ते नागपूरला वास्तव्यास आले. येथे त्यांनी काही काळ लेखन केले. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोक व्यक्त होत आहे.