भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे अशा तक्रारी आता मोबाईलच्या एका क्लिकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बऱयाचदा रिक्षा-टॅक्सीमधून प्रवास करताना जादा भाडे आकारणे, जवळचे भाडे नाकारणे किंवा अन्य कारणांनी प्रवाशांचे चालकांशी नेहमीच वादविवाद होत असतात.

अशा वेळी प्रवाशांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनचा आधार घ्यावा लागतो. परंतु त्यावरूनही प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा होण्यास विलंब होत असल्याने परिवहन विभाग लवकरच अशा प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप सेवेत आणणार आहे.

राज्य परिवहन विभागाने प्रवाशांच्या तक्रारीकरिता टोल फ्री क्र. 18001208040 जारी केलेला आहे. तसेच मुंबई वाहतूक पोलिसांची 8454999999 ही हेल्पलाइन आहे. याबरोबरच प्रवाशांच्या तक्रारींचा छडा लावण्यासाठी परिवहन विभागाने 2017 मध्ये मोबाईल अॅपची सुविधा आणली होती, परंतु दीड वर्षानंतर ही सेवा बंद पडली.

आता पुन्हा मोबाईल अॅपवरून प्रवाशांना तसेच वाहन चालकांनाही आपली गाऱहाणी मांडता यावीत यासाठी महिनाभरात नवीन मोबाईल अॅप विकसित केले जाणार आहे. तसेच तक्रारींचा माग घेण्याकरिता बॅकअप ऑफिस आदी यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. या अॅपमध्ये परिवहन विभागाच्या विविध सेवांविषयी माहितीही देण्यात येणार आहे.

केवळ प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा न करता वाहन चालकांना आरटीओ कार्यालयासंदर्भातील परवाना, लायसन्स व वाहन सेवेत येणाऱया तक्रारीही यावर नोंदविता येणार आहेत.