
एकीकडे बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बसेस जुन्या झाल्याने त्या मोडीत काढण्यात येत असताना आता बेस्टने नव्या डबलडेकर बसेस खरेदीसाठी टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या डबल डेकरला दोन दरवाजे आणि जिने असणार असून ते स्वयंचलित उघड-झाप होणारे असल्याने ही बस प्रवाशांसाठी एकदम सुरक्षित असणार आहे.
बेस्टची डबलडेकर बस ऐतिहासिक असून मुंबईकरांसह ती पर्यटकांनाही नेहमी आकर्षून घेत असते. परंतू डबलडेकर बसचा मेन्टेनन्सचा खर्च जाता असल्याने शिवाय तिला दोन कंडक्टरची गरज असते. शिवाय हल्ली बहुतांशी बसेस सीएनजीवर चालविण्याचा प्रघात असताना ही डबलडेकर डिझेलवरच धावणारी असल्याने प्रदुषणामुळेही तिला चालविणे अवघड बनले आहे. तरीही सध्या बेस्टच्या ताफ्यात 122 डबलडेकर बसेस आहेत.
प्रवाशांसाठी संपूर्ण सुरक्षित बस
बेस्ट आता नवीन डबलडेकर बसेससाठी निविदा काढणार आहे. ही निविदा प्रक्रियेचे सोपस्कार पूर्ण झाले की अगदी नवीन डिझाईनची भारत-6 श्रेणी आणि स्वयंचलित गिअरची डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. नवीन डबलडेकर बसमध्ये एकाऐवजी दोन दरवाजे, दोन जिने, सीसीटीव्ही क@मेरे आदींचा समावेश असेल. हे दरवाजे स्वयंचलितपणे उघडबंद होणारे असून त्यांचे नियंत्रण ड्रायव्हरकडे असणार आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही कमी होणार आहे. ही बस सीसीटीव्हींनी परीपूर्ण असणार असून दोन्ही कंडक्टरना एकमेकांशी संपर्प करण्यासाठी खास यंत्रणा देखील असणार आहे. प्रवाशांना बसथांब्यांची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्डही असणार आहेत.






























































